बीड दि.१२:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात कोरानाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या ४८ तासांमध्ये तिघांचा कोरानामुळे मृत्यू झाल्याची घटना घडलेली असतांनाच आज पहाटे बीड शहरातील एका ७५ वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरानाने ११ जणांचे बळी घेतले आहेत.
बीड शहरातील किल्ला मैदान येथील ७५ वर्षीय महिलेचा रिपोर्ट काल सायंकाळी पॉझिटिव्ह आला होता. तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. रात्री उशिरा महिलेची प्रकृती खालावल्याने ऑक्सिजन लावण्यात आले होते. मात्र आज पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास सदरील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने महिलेच्या दफनविधीची शासकीय प्रक्रिया पुर्ण केली असुन नगरपालिका, संबंधित पोलिस ठाणे यांच्याशी पत्र व्यवहार केला आहे. सदरील महिलेचा तकीया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये दफनविधी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान काल सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उमापुर (ता.गेवराई) येथील रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर पाटोदा तालुक्यातील येवलवाडी, बेनसुर येथील दोन बांधितांचा पुणे येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर आत बीडमध्ये महिलेचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ११ झाली आहे.