पाटोदा तालुकाबीड जिल्हामनोरंजन

मराठी चित्रपटसृष्टीतील नवा ऍक्शन हिरो विकास बांगर 'उन्मत्त' मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

उन्मत ह्या साय-फाय चित्रपटामध्ये फाईट सीन शूट करायचे होते. सगळे फाईट सिक्वेन्स खरे वाटण्यासाठी कुठल्याही वायर वर्क्सचा वापर करायचा नाही असं दिग्दर्शक महेश राजमाने ह्यांनी ठरवल्यामुळं कलाकारांची मोठी चाचणीच होती. महेश राजमाने ह्यांनी त्यांच्या ह्या आधीच्या म्हणजे मुक्काम पोस्ट धानोरी ह्या चित्रपटात सगळे स्टंट्स स्वतःच केले होते. त्यामुळं सगळे फाईट सीन्स खरेच वाटले पाहीजे ह्याकडे राजमाने स्वतः जातीनं लक्ष घालत होते. त्यात भावेश जोशी ह्या चित्रपटाचे स्टंट आणि फाईट कोरीओग्राफर प्रतीक परमार हे उन्मत्तच्या फाईट कोरीओग्राफ करत असल्यामुळे प्रत्येक फाईट जिवंत झाली आहे.

ह्या चित्रपटात लीड रोल केलेला विकास बांगर हा चीन येथून कुंगफू आणि चीन बॉक्सींगचं प्रशिक्षण घेऊन आलाय आणि प्रमुख भुमिकेत असलेली आरुषी ही मार्शल आर्टची कुशल फायटर आहे. हे सगळे कलाकार चित्रपटातला प्रत्येक सीन इतका समरसून करत होते की एका फाईट सीनच्या दरम्यान विकासला इजा झाली. इजा म्हणजे नुसतं खरचटणं किंवा मुका मार नाही तर त्याला तब्बल नऊ टाके पडले.अर्थात इतकी मोठी जखम होऊनही पठ्ठ्याच्या चेहऱ्यावर वेदनेऐवजी आनंदच होता, कारण सीन उत्तम वठल्याची शाबासकी त्याला दिग्दर्शकाकडून मिळाली होती. हे असे कलाकार उन्मत्तमध्ये असल्यानं चित्रपट चांगलाच होणार ह्याची महेश राजमाने ह्यांना खात्रीच होती.

विकास हा मूळचा बीड जिल्ह्यातील अभिनेता असून त्याने नसिरुद्दीन शाह यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवले आहेत. उन्मत्त या चित्रपटासाठी त्याची निवड तब्बल १००० मुलांमधून करण्यात आली होती. या चित्रपटासाठी मार्शल आर्टस् येणारा अभिनेता दिग्दर्शकाला हवा असल्यामुळे त्यांनी १००० मुलांची ऑडिशन घेऊन त्यांच्यामधून विकासची निवड केली.

विकासकडून अशीच उत्तम कामगिरी घडो अशी अपेक्षा त्याच्या मूळ गाव भायाळा तालुका पाटोदा येथील गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

विकास बांगर हा दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील बांगर कुटुंबातील रामकृष्ण बांगर यांचा चिरंजीव.

फक्त फाईट सीन्सचं नाहीत तर उन्मत्त ह्या चित्रपटात स्पेशल इफेक्टही अप्रतीम झाल्याचं ट्रेलर वरुन समजतय. त्यात असलेला अंडरवॉटर सीन तर हॉलीवूडपटाला तोडीस तोड असाच आहे.सूत्रांच्या माहितीनुसार काही सीन्स तब्बल चाळीस फूट खोलीवर शूट करण्यात आले आहेत.ह्या चित्रपटाची कथाही सायन्स फिक्शन ह्या सदरात मोडणारी असून त्याच्या ट्रेलरची सगळीकडेच चर्चा आहे. थोडक्यात उन्मत्त हा विज्ञानपट पाहायलाच हवा.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.