परळी दि. २५: गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने डिसेंबर महिन्यात झालेल्या आरोग्य शिबीरातील दिव्यांगांना जयपूर फुट व कर्णबधिरांना श्रवणयंत्राचे वाटप काल करण्यात आले. जयफुर फुट मिळाल्याने आनंदित झालेल्या दिव्यांग व्यक्तींच्या चेह-यांवर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान विषयी कृतज्ञतेची भावना दिसून आली.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त डिसेंबर महिन्यात गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रीतमताई मुंडे यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या शिबीराला रूग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. शिबीरात सुमारे आठ हजार रूग्णांची तपासणी झाली तर ४१४ रूग्णांवर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या.
दिव्यांगांना मिळाला आधार
शिबीरात दिव्यांग (अपंग) व्यक्तींनी देखील सहभाग घेतला होता. एक हात किंवा पाय नसलेल्या १९ अपंगाची तर कर्णबधीर असलेल्या १५३ रूग्णांची नोंद यावेळी झाली होती. या सर्वांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. काल उप जिल्हा रूग्णालयात १९ दिव्यांगांना उच्च दर्जाचे दोन लाख रुपये किंमतीचे जयपूर फुट व कृत्रिम अवयव बसविण्यात आले तर १५३ कर्णबधीरांना साठ हजार रुपयांचे श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत तज्ज्ञ डाॅक्टरांनी पथकाने दिव्यांगांना अवयवांचे रोपण केले. दरम्यान, प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या उपक्रमांमुळे दिव्यांगांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहता आले, कृत्रिम अवयव मिळाल्यानंतर त्यांच्या चेह-यांवर कृतज्ञतेचे भाव खूप काही सांगून गेले.