महाराष्ट्र राज्य

ग्रामविकासा बरोबरच सर्व घटकांच्या विकासाला चालना देणारा अंतरिम अर्थसंकल्प―ना. पंकजाताई मुंडे

ग्रामपंचायत इमारती, अंगणवाडी, रस्ते, पाणी पुरवठा योजनेसाठी भरीव तरतूद

मुंबई, दि. २७ : राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करुन राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला चालना देणारा, ग्रामविकासाला बळकटी देणारा आणि राज्य कुपोषणमुक्त करण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करणारा असा आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अंतरीम अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्याच्या ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.

अंतरीम अर्थसंकल्पात पोषण आहारासाठी एक हजार ९७ कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यामुळे राज्याला कुपोषणमुक्त करण्याचे ध्येय लवकरच साध्य होऊ शकेल. कृषी विकास, सिंचन, आरोग्य, प्रधानमंत्री आवास योजना यांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे.

आजच्या अंतरीम अर्थसंकल्पात ओबीसी विभागासाठी २ हजार ८२९ कोटी रुपयांचा तर महिला व बालविकास विभागासाठी २ हजार ९२१ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. नवतेजस्विनी योजनेतून महिला उद्योजकांना सहाय्य करण्यात येणार आहे. समाजातील वंचित घटकांस सहाय्यभूत अशा विविध कल्याणकारी योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम, आदर्श अंगणवाड्यांची निर्मिती, ग्रामीण रस्ते, जलसंधारण, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा यासाठीही चांगली आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यातून ग्रामविकास चळवळीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

वित्त मंत्र्यांनी आज २०१९-२० या वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. पुढील अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईपर्यंत आवश्यक असणाऱ्या खर्चाची तरतूद या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.