मुंबई : विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे उद्या गुरुवार दिनांक 22 मे रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. या भागात सध्या पाणीटंचाईच्या मोठ्या समस्येला जनतेला तोंड द्यावे लागत आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे बहुतांश धरणे ही शहापूर तालुक्यात आहेत. मात्र या धरणातून शहापूर तालुक्यातील जनतेला पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत त्यामुळे या भागातील जनतेला पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत असून जनतेत मोठ्या प्रमाणावर उद्रेक निर्माण झाला आहे.
त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे उद्या या भागाचा दौरा करणार आहेत. एका दिवसात ते तब्बल 13 गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांची संवाद साधणार आहेत . या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग वरोरा हे ही त्यांच्यासोबत असणार आहेत.
या दौ-यात ते पेठेचा पाडा, आंब्याचा पाडा, ठेंगनमाळ, तेलमपाडा, पाटोळपाडा, ढाकणे, धुपारवाडी, रोड वडाळ, जाम्भूळ पाडा, बाबरेवाडी, पोकळवाडी, जळकेवाडी, कोठारे या 13 गावांना भेटी देणार असून सकाळी 11 वाजल्या पासून या दौ-यास सुरुवात होणार आहे.