पाटोदा (शेख महेशर) दि.२८ :पाटोदा तालुक्यात भयाण दुष्काळ पडलेला असुन पाटोदा शहरातील सर्व हातपंप, विहिरी व बोअर चे पाणी संपले आहे. तसेच पाटोदा तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडला असुन या मुळे पाण्याची पातळी खालावली आहे. सध्या पाटोदा शहरासाठी सौताडा येथील तलावातुन टॅकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु सौताडा येथील तलावाची पाणी पातळी कमी झालेली आहे. सध्या पाटोदा तालुक्यातील सौताडा, भायाळा, उंखडा तलावा मध्ये पाणी उपलब्ध आहे. परंतु पाटोदा तालुक्यातील उंखडा तलावा मधील पाणी बीड व शिरुर (कासार) तालुक्यात टॅकरव्दारे नेले जात आहे. सदरील उंखडा तलाव पाटोदा तालुक्यात असल्याने सदरील उंखडा तलावाचे पाणी पाटोदा तालुक्यासाठी व शहरासाठी आरक्षित करणे आवश्यक आहे. जर उंखडा तलावातील पाणी आरक्षित केल्यास पाटोदा शहरास पाणी टंचाई भासणार नाही. व येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या संकटाचा सामना करता येईल. या साठी तालुक्यातील उंखडा, भायाळा, सौताडा साठवण तलावातुन टॅकरव्दारे पाटोदा शहरासाठी पाणी पुरवठा करावा. असे निवेदन तहसीलदार पाटोदा यांना वकील संघाचे तालुका अध्यक्ष अॅड.जब्बार पठाण, किशोर आडागळे, अरविंद सरोदे यांनी दिले आहे.