”जात पात खोटी, माणुसकी मोठी,
सांगितल्या गोष्टी आयुष्याच्या..!
”मला चीड येत नाही
हाच माझा गुन्हा
दोष देऊ कुणा
सांगा दोष देऊ कुणा”
कष्टाचे सागर उपसुन दौलतीचे डोंगर रचणारा दलित कष्टकरी समाजासाठी स्वत:चे आयुष्य खर्ची घालून बदल घडवून आणणारा,अज्ञान-अंधश्रध्दा-दारिद्रय निर्मूलनासाठी विज्ञानवादी विचार मांडणारा,अवघ्या आयुष्यात अगदी दिड दिवस शाळा वाट्याला येऊन सुध्दा,एक महान साहित्यिक,कलावंत, विचारवंत,लेखक,कवी म्हणून पिढयान्पिढया आपला प्रेरणादायी आवाज लेखणीच्या व जबानीच्या माध्यमातून जिवंत ठेवणारा,अन्यायाविरुध्द बंड करुन उठणारा शिव-फुले-शाहु-आंबेडकरी विचारांना पुढे घेऊन चालणारा बहूजनांचा नायक,हरघडी झुंजणारा योध्दा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन…! वाचकांच्या माहितीस्तव अण्णा भाऊंच्या आदर्श कार्याची महती सांगणारा शिवव्याख्याते रामकिसन मस्के (अंबाजोगाई,जि.बीड) यांचा प्रबोधनपर लेख…
क्षणोक्षणी झुंजत असताना अण्णा भाऊंनी इतिहास घडवला.अण्णा भाऊ साठे इतिहासात एकमेव असे आहेत ज्यांचे नांव वडिलांच्या नांवासहित घेतले जाते.त्यांचे नांव अण्णा व त्यांच्या वडिलांचे नांव भाऊ.पुढे हेच अण्णा भाऊ साठे या नावाने ओळखले जाऊ लागले.अण्णा भाऊंची प्रसिध्द कादंबरी “फकिरा” त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी समर्पित केली.शिव-फुले-शाहु-आंबेडकरी विचारांवर त्यांची प्रगाढ श्रध्दा होती.त्या विचारांचा त्यांच्या मनात प्रचंड आदर होता,हे त्यांच्या साहित्यातून वेळोवेळी प्रकट होते.ज्यांनी सातासमुद्रापार रशिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगितले,तमाशाला नवे जनजागृतीचे स्वरूप आणले ते हेच ते अण्णा भाऊ.अण्णा भाऊंच्या ग्रंथालयात महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स,शाहुजी महाराज, आगरकर,वि.रा.शिंदे, भाऊराव पाटील,संत गाडगे महाराज यांच्या ग्रंथाचा समावेश होता. त्यांना दलित व उपेक्षित, शेतकरी,शेतमजुर,यांचा विकास व आदर्श जातिविरहीत समाजव्यवस्था मान्य होती.परंतु,आजही देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होऊन हा घटक सुधारणेपासून दूर आहे.भारतीय समाज अंधश्रध्देच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी अण्णा भाऊंनी अनेक कथा-कांदबऱ्या लिहिल्या.त्यापैकी मरीआईला गाडा, स्मशानातील सोनं, थडग्यातील हाडे इ.काही कथांच बरचसं वाचन झालेलं आहे.आज अण्णा भाऊंची जयंती.अंगावर गुलाल टाकून,वाजत-गाजत-नाचत मिरवणुक काढणे म्हणजे जयंती नव्हे तर गावपातळीवर विचारांचा जागर करुन व्यसनमुक्त,दंगलमुक्त, आत्महत्या मुक्त आदर्श गाव आदर्श महाराष्ट्र व पर्यायाने आदर्श भारत निर्माण होणे महत्वाचे आहे.अण्णा भाऊ हे सच्चे समाजसुधारक. त्यांनी जे अनुभवलं भोगलं व साहिलं त्याचा त्यांनी अंत:र्मुख होऊन विचार केला व तेच साहित्यात उतरवलं.सामान्य माणसं जीवन कसं जगतात,ती तशी का वागतात,सदोदित परिस्थितीशी झुंज का देतात याचसोबत त्यांच्या जीवनात झुंज कोणी निर्माण केली.याचा शोध अण्णा भाऊंच्या साहित्यात आहे.पृथ्वी ही कोण्या शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून शेतकरी,श्रमिकांच्या कष्टावर उभी आहे,असा विज्ञानवादी विचार त्यांनी दिला तसेच जगण्यासाठी रडू नका,तर लढा असा संदेशही त्यांनी दिला.अण्णा भाऊंच्या साहित्याचे 17 विदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.अण्णा भाऊंना शोषणाचा अंत करणारी संघशक्ती अभिप्रेत होती.समग्र जीवन बदलवून टाकणारी दृष्टी अभिप्रेत होती.अण्णा भाऊ म्हणतात.”माझी जीवनावर फार निष्ठा आहे,मला माणसं फार आवडतात,त्यांची श्रमशक्ती महान आहे,ती जगतात आणि जगाला जगवतात यावर माझा विश्वास आहे.” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शोकसभेला अभिवादन करताना अण्णा भाऊ म्हणतात,
”जग बदल घालुनी घाव
सांगून गेले मज भीमराव”
पुढे अण्णा भाऊंनी उभा केलेला संघर्षाचा लढा ज्याची इतिहास विशेष दखल घेतो तो मानवमुक्तीचा,नवसमाज रचनेचा,जुलूम,अन्याय,अत्याचारावर प्रहार करणारा लढा आहे.अण्णा भाऊंनी अनेक भाषणातून नाटकांतून शाहिरी पोवडयांतून,वगनाट्यातून तसेच कलापथकाच्या माध्यमातुन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढून जनजागरण केले.शेतकरी,कष्टकरी समाजासाठी ते म्हणतात,
”तू मराठमोळा शेतकरी,
असे घोंगडी शिरी,
जुनी ती काठी जुनी लंगोटी,
बदल ही दुनिया सारी,
रे बदल ही दुनिया सारी,”
साठे म्हणायचे की,माझा गाव,माझी माणसं,माझे राष्ट्र व माझा देश सुसंपन्न, सुसंस्कृत,सुसभ्य, सुशिक्षित,सधन,समृध्द व्हावा अशी स्वप्ने मला रोज पडतात.अण्णा भाऊंचे हे स्वप्न सत्यात उतरवणं ही आज आपली सर्वांची जबाबदारी व काळाची गरज आहे.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज तसेच महात्मा फुले,छत्रपती शाहूजी महाराजांनी मनुस्मृती झुगारली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली,त्याचप्रमाणे अण्णा भाऊ साठे यांनीही या विषमतावादी समाजव्यवस्थेच्या विरूध्द आपला लढा अधिक तीव्र केला.अण्णा भाऊंचा लढा मानवमुक्तीचा,सामाजिक सलोखा निर्माण करणारा,नवसमाज रचनेचा,मानवतेचे जीवन बहाल करणारा,जुलूमाविरूध्द सामान्य माणसाला लढण्याला बळ देणारा होता.अण्णा भाऊंनी सांगितले,’तू जगाचा धनी आहेस,तू जगाचा पालनकर्ता आहेस,तू संपत्तीचा निर्माता आहेस,तू जगतोस,कष्ट करतोस आणि समाजाला जगवितोस व जागवितोस.तू गुलाम नाहीस तुच खरा मालक आहेस.तू स्वाभिमानी हो,तु जागा हो,तू क्रांतीकारी हो,तू जग बदलविण्यास सज्ज हो.“उठ माणसा जागा हो! संघर्षाचा धागा हो.” असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी सामान्यांमध्ये निर्माण केला.त्यासाठी सामान्य माणसाला जागं करण्यासाठी ते म्हणतात,
”यारे हातात गोफण घेऊ
रान राखाया एकीनं जाऊ
ऐतखाऊंना हाकलून देऊ !”
चित्राची पुजा करण्यापेक्षा अण्णा भाऊंच्या विचारांची पुजा करावी.आज गरज आहे ती आत्मपरीक्षणाची, स्वत:ला तपासा ओळखा आणि सज्ज करा एका कवीने सांगितलेच आहे की,
”शोधून पाहिले मी,
माझेच गांव नाही,
यादीत माणसांच्या
माझेच नांव नाही.”
अशी आपली अवस्था होता कामा नये.15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 16 ऑगस्ट 1947 ला अण्णा भाऊ साठे म्हणाले,
”यह आझादी झुठी है
इस देश की जनता भूखी है !”
स्वातंत्र्य मिळुन आज 70 वर्षानंतर सुध्दा सामान्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य कमी झालेले नाही.यासाठी अण्णा भाऊ साठेंच्या विचारांच्या माध्यमातुन आपल्याला स्वातंञ्याची दुसरी लढाई सुरु करावयची आहे.आजही अनेकांच्या हाताला काम,जगण्याला प्रतिष्ठा व पोटाला भाकर मिळत नाही.आजही तेल,दूध दगडावर ओततात.पण,सामान्यांपर्यंत ते पोहचत नाही.लग्नासारख्या समारंभात अन्नाची नासाडी होते.तसेच अक्षतांच्या माध्यमातून लाखो टन तांदूळ वाया घालवला जातो.आणि आजही अन्नान्न करुन मरणारे आमच्याकडे कमी नाहीत याचा कधी विचार होणार की नाही ? आज आपल्या देशातील बांधवांचे चित्र विदारक आहे.नको त्याच्या नावाखाली सामान्यांची लूट चालू आहे.धर्माचा ठेका घेतलेले काही लोक समाजात सांस्कृतिक दहशतवाद पेरीत आहेत.काही कथीत रक्षकांनी तर ठराविक जातीच्या लोकांना लक्ष्य करून माणसांनाच सोलून काढणे चालू केले आहे.यावर सुप्रसिध्द कवी प्रा.फ.मुं.शिंदे म्हणतात,
”परिवर्तनाच्या चळवळी चालतात,
धर्म-धर्मांशी बोलतात,
जाती-पोटजातीला टोलतात,
कार्यकर्ते एकमेकांना ढोरासारखेच सोलतात,नेते मात्र त्यांनाही स्वार्थानचं तोलतात.”
यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.तरुण व्यसनांच्या गर्तेत लोटला जात आहे.शेतकरी व शेतीला वाईट दिवस आले आहेत त्यामुळं शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत.ज्या अण्णा भाऊंनी मराठी भाषेला साहित्याच्या माध्यमातून वेगळं महत्त्व प्राप्त करवून दिलं,त्यांचा जयंतीदिन म्हणजेच 1 ऑगस्ट हा मराठी भाषा दिन म्हणुन साजरा व्हावा,अशी आपली सर्वांची मागणी आहे.सर्वांच्या सुखाच्या दिवसासाठी अण्णा भाऊंनी लढा उभा केलेला.हा लढा आता आपल्याला लढावा लागेल.आणि “दंगलमुक्त भारत”, “आत्महत्यामुक्त शेतकरी” व “व्यसनमुक्त तरुण” ही अभियाने देशपातळीवर उभी करावी लागतील.त्यासाठी आज अण्णा भाऊ साठे जयंतीच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक आणि उदंड शुभेच्छा..!
जय जिजाऊ !
जय शिवराय !
जय ज्योती !
जय भिमराय !
जय अण्णा भाऊ !
लेखक-रामकिसन गुंडिबा मस्के
मो.9422930017