कार्यकर्ते, दूध उत्पादकांनी सहभागी व्हावे – सतीश मुंडे, जुगलकिशोर लोहिया
परळी वैजनाथ दि.३१:आठवडा विशेष टीम―
राज्यातील दुध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला असुन त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. दुधाला 30 रूपये भाव देण्यात यावा, प्रति लिटर 10 रूपयाचे अनुदान जाहीर करून थेट दुध उत्पादकांच्या खात्यात जमा करावे, दुध भुकटी करीता प्रति किलो 50 रूपये अनुदान द्यावे, शासनाने 30 रूपये प्रति लिटरप्रमाणे दुध खरेदी करावे, सर्व दुधाळ जनावरांचा शासनामार्फत वीमा काढण्यात यावा, मागणीप्रमाणे दुध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जावा आदी मागण्यांसाठी भाजपच्यावतीने लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या 1 आॅगस्ट रोजी परळीत आंदोलन करण्यात येणार असून यात कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे व शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.
दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. कोरोना लाॅक डाउनमुळे मोठी घट झाली आहे. तर सरकी पेंड व सुग्रास खाद्य यांचे वाढलेले भाव, आणि दुधाचे घसरलेले भाव लक्षात घेता झालेला खर्च ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे हा व्यवसाय आज अडचणीत सापडला आहे. बिसलरी पाण्याची बॉटल 20 रुपयाला आणि दूध मात्र 17रू. या बेताल परिस्थितीमुळे दूध व्यवसाय मोडकळीस निघण्याची वेळ आली आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध २० ते २२ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे.
गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी,सर्व दुधाळ जनावरांचा शासनामार्फत विमा काढण्यात यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे कर्ज पुरवठा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी परळीत भाजपच्यावतीने लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दि. 1 आॅगस्ट आंदोलन करण्यात येणार आहे.
शनिवारी सकाळी सकाळी 10 वाजता ईटके काॅर्नर येथे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून यात कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.