आंतरराष्ट्रीय

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान उद्या सोडणार ; भारताच्या दबाव तंत्राचा परिणाम

इस्लामाबाद दि.२८ :विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारताकडून सुरू असलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी सुटका होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत केली आहे. ''भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत,'' असे इम्रान खान यांनी अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची घोषणा करताना सांगितले.

बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या सैन्याला सापडले होते. दरम्यान, अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारत सरकार कडून आक्रमक पावले उचलण्यात आली असून, त्यासंदर्भात पाकिस्तानशीही संपर्क साधण्यात आला होता.

आज पाकिस्तानमधील संसदेत संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, ''भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत, मात्र पाकिस्तानने उचललेल्या या पावलाला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे मूळ हे काश्मीर आहे'' असा दावा इम्रान खान यांनी केला आहे.

दरम्यान,अभिनंदन यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी भारताने केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयामधील सुत्रांनी दिली होती. तसेच अभिनंदन यांना काही झाल्याच भारत कठोर पावले उचलेल असा इशाराही देण्यात आला होता.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.