आठवडा विशेष टीम―
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सर्व रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांवर उपचाराच्या प्रोटोकॉलचे अनुसरण योग्य प्रकारे केले जाते का यासाठी तपासणी पथकाव्दारे पहाणी करून काही त्रुटी असतील तर त्या दुरूस्त कराव्यात. शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे देयक आकारणी होते का ते पहावे. हॉस्पीटलमध्ये दरपत्रक लावावे. आवश्यक औषधांची उपलब्धता करावी. रूग्णांना चांगले व योग्य वेळेत योग्य ते उपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय, खाजगी व उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमवेत तज्ज्ञ डॉक्टरांशी झूम मिटींग घेण्यात येईल, यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी तालुकानिहाय कोरोना रूग्णांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन करण्यात येत असलेल्या उपाययोजना, उपलब्ध असलेल्या व नव्याने विविध ठिकाणी उपलब्ध करण्यात येत असलेल्या बेड्सबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या ठिकाणी विहीत वेळेत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशनही पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.