महाराष्ट्र राज्यराजकारण

राष्ट्रवादीचा शिवसेनेला 'दे धक्का' ; उपनेते डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत

औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाण यांचाही प्रवेश

मुंबई प्रतिनिधी दि.०१ :शिवसेनेचे उपनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. याशिवाय औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाणही भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेमध्ये दाखल झाले.

डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्वागत केले. राजा शिवछत्रपती साकारणारे आणि आता राज्यातील घराघरात गाजणाऱ्या स्वराज्य रक्षक संभाजींचा स्वाभिमानी इतिहास उभा करणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला, अशी घोषणा जयंत पाटील यांनी केली.

या निमित्ताने बोलताना ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजी कसे होते हे मांडल्याचे सांगतानाच ते सुशिक्षित आहेत. त्यांचा निवडणुकीत पक्षास फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपामध्ये वाईट अनुभव घेतल्यावर ते स्वगृही परतले आहेत, असेही पाटील म्हणाले. नंदुरबारमधील भाजपाचे नेते यश पाटील, किशोर पाटील, भाजप डॉक्टर सेलचे हर्षल पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचेही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्वागत केले.

तरुणाईला योग्य दिशेची गरज असल्याची जाणीव फक्त शरद पवार यांच्या नेतृत्वात - अमोल कोल्हे

आज देशाच्या राजकारणात फार मोठी अस्वस्थता आहे. तरुणाईला योग्य दिशेची गरज आहे. ही जाणीव शरद पवार यांच्याच नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करावे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, असे या वेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. आता आनंद होत आहे की, लहानपणी शरद पवारसाहेबांची छबी बघण्यासाठी त्यांच्या गाडीमागे मी धावत होतो. परंतु आज त्यांच्याच पक्षाचे काम करायला मिळत आहे. यापुढे पक्षाचे काम अखंड सुरू राहील, असेही डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    दरम्यान, पक्षप्रवेशाच्या या मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेला विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदीही उपस्थित होते.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.