खरच लोकांमध्ये ट्राफिक सेन्स आहे का? का वाहतूकीचे नियोजन चुकतेय ?
गेल्या कांही दिवसात रस्त्यावरील अपघातांची संख्या भराभर वाढू लागली आहे . वर्तमानपत्र उघडा , टीव्ही बघा , व्हॉट्स अप मधील मेसेज वाचा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातील कोणताही न्यूज चॅनेल सर्च करा . तुम्हाला एक तरी अपघाताची बातमी दिसते. कोणताही रस्ता किंवा कुठले ठिकाण वर्ज्य नाही . अपघात होतच आहेत . बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे . जोपर्यंत अशा अपघातात आपले कोणी सापडत नाही , तोपर्यंत त्याच्या झळा आपल्यापर्यंत पोहोचणारच नाहीत का ? आपण यातून काही बोध घेणार आहोत की नाही ? ही अपघातांची , बळींची आणि जखमींची संख्या कमी करण्यासाठी कोणतीच पावले उचलणार नाही आहोत का? कायद्यात रस्ते वाहतूक सुरक्षेसाठी अनेक योजना असताना , त्यातील कशाचाच विचार आपण करणार नाही का ? एखादे वाहन रस्त्यावरून चालवायचे कसे , याबद्दल काही शास्त्रीय नियम असतात . कायदेशीर बंधने देखील असतात . पण आजकाल रस्त्यावरून चालताना किंवा रस्त्यावरून वाहन चालवताना आजूबाजूला नजर टाकता याचा सर्वांनाच विसर पडलेला दिसतो.शहरातील भरमसाठ लोकसंख्या हे त्याचे पहिले कारण . त्यापुढचे कारण म्हणजे या भरमसाठ वाढणाऱ्या लोकसंख्येला कोणत्याही प्रकारची शिस्त नसणे . रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करता आपल्या
शहरातील लोकांना ‘ट्रॅफिक सेन्स ‘ नाही असे खेदाने म्हणावे लागेल .मागे एकदा सर्वात उद्धट लोकांचे शहर कोणते याची आजमावली केल्यानंतर त्यात सोलापूर चा पहिला नंबर येईल. एकंदरच आजकाल आपल्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन म्हणजे तरुण मंडळीना खेळणे वाटते. हे खेळणे देखील ज्या गांभीर्याने हाताळायला हवे. त्या गांभीर्याने ते हाताळले जात नाही, नीट वापरले जात नाही.
वाहन चालविताना आपण वाहतुकीचे नियम पाळून,सावकाश,कर्कश हार्न न वाजविता,सुसाट न चालविता,सिग्नल ला व्यवस्थित थांबून वाहन चालविल्यास अपघाताला आळा बसेल.आपण सुरक्षित राहू.नाहक आपण सुरक्षित राहण्यासाठी “पोलिसांना” का जबाबदार धरायचे?
“वेळीच सावध व्हा!काळजी घ्या.
लेखक-संजय रूपनर
7588289533