नाशिक जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकारण

पंकजा मुंडे , शरद पवार नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर ; लोकनेते मुंडे साहेबांच्या पुतळ्याचे थाटात अनावरण

मुंडे साहेबांचा वारसा सक्षमपणे चालविताना कौतुकच होते, हे माझं भाग्यच - ना. पंकजाताई मुंडे

नाशिक दि. ०३ :लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पश्चात राजकारणामध्ये काम करत असताना त्यांचा वारसा सक्षमपणे चालवताना टीका न होता कौतुक होते. हा वारसा चालवणे आणि तो सशक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील सामान्य जनतेने पुढे येणे हे भाग्य खूप कमी लोकांच्या वाट्याला येते अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे आपल्या भावना व्यक्त केल्या.

क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण व महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व ना. पंकजाताई मुंडे व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. जितेंद्र आव्हाड, आ. बाळासाहेब सानप, आ.सीमा हिरे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. देवयानी फरांदे, समीर भुजबळ, नरेंद्र दराडे, अनिल कदम, राहुल आहेर, हेमंत टकले, किशोर दराडे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार दिलीप बनकर, जगन्नाथ धात्रक, वसंत गीते, तुकाराम दिघोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.पंकजाताई म्हणाल्या, ऊसतोड मजुरांच्या समुदायात जन्मलेल्या एका सामान्य व्यक्तीने राज्याचे व देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न अशा दशकात पाहिले जे त्यावेळी शक्य नव्हते, परंतु मुंडे आणि संघर्ष आणि प्रत्येक संघर्षांत विजय हे समीकरण असल्याने मुंडे साहेब राज्याचे आणि देशाचे नेते झाले. मुंडे साहेबांचा पुतळा महाविद्यालयातील विद्यार्थ्याना परिस्थितीशी संघर्ष करून यश संपादित करण्यासाठी कायम प्रेरणा देत राहील.ज्यांनी राजकारणापलीकडे जाऊन राजकारण विरहित मैत्रीचे ऋणानुबंध जपले त्यांनी राजकीय विरोधाची भूमिका सुद्धा प्रामाणिकपणे निभावली. ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करत असताना ऊसतोड कामगार व ऊस उत्पादक शेतकरी अशा दोन्ही विषयांवर त्यांनी योग्य समन्वय साधला होता असे त्या यावेळी म्हणाल्या.

पवारांचं राजकारण समजणाऱ्या व्यक्तींचा मेंदू शार्प होतो

लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी एका मंचावर एकत्रित आलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना ना.पंकजाताई म्हणाल्या, राजकीय पक्ष म्हणून एकमेकांसोबत लढत असताना पवार साहेब काय करतील एवढा विचार जरी कोणी राजकारण्यांनी केला तरी मेंदू शार्प होतो. माणूस दोन लोकांकडून नेहमी काहीतरी शिकतो, एक ज्यांच्या विचारांवर चालतो आणि दुसरा ज्यांच्या विचारधारेशी लढतो, असे सांगून ना.पंकजाताईंनी दादागिरी हा माझा आवडता शब्द आहे, पण ती दादागिरी समाजातील गोरगरीब, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी करायला मला आवडते असे त्या म्हणाल्या.

अन् पवारांनी पुढे केले रायटींग पॅड

यावेळी बोलतांना आ. जितेंद्र आव्हाड यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्याशी आमचे प्रेमाचे संबंध होते, मी राष्ट्रवादीचा असलो तरी त्यांनी प्रेम कधी कमी केले नाही. तोच स्नेह आजही आहे, ना. पंकजाताई यांच्याकडे कधीही गेलो तरी एक, दीड कोटी रूपये मिळतील अशा कागदांवर त्या केव्हाही सही करतात. हे ऐकताच ना. पंकजाताईंच्या शेजारीच बसलेल्या शरद पवार यांनी तातडीने सहीसाठी पंकजाताई यांच्या पुढे रायटींग पॅड पुढे केले हे पाहून उपस्थितांनी एकच हास्यकल्लोळ करत सभागृह डोक्यावर घेतले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.