अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

पावनपर्व महाशिवरात्री निमित्ताने आयोजित सामुहिक योग अभ्यास (मेडीटेशन) शिबीर व प्रवचनाचा अंबाजोगाईकरांनी घेतला लाभ

परमात्म्याशी संवाद केल्यास आशिर्वाद मिळतो-सुनिता बहेनजी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय,अंबाजोगाई सेवा केंद्राच्या वतीने पावनपर्व महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी सामुहिक योग अभ्यास शिबीराचे व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.या सामुहिक योग अभ्यास शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन अंबाजोगाईकरांनी त्याचा लाभ घेतला. यावेळी बोलताना अंबाजोगाई सेवा केंद्राच्या मुख्यसंचालिका ब्रम्हाकुमारी सुनिता बहेनजी म्हणाल्या की, स्वतःत बदल घडविल्यास जग बदललेले दिसेल आपण आयुष्यभर प्रामाणिक वागल्यास पुढील पिढी त्याचे अनुकरण करेल,परमात्म्याशी संवाद केल्यास आशिर्वाद मिळतो असे सांगुन त्यांनी महाशिवरात्रीपर्व याचे अध्यात्मिक रहस्य व सर्व योगांमध्ये राजयोग सर्वश्रेष्ठ असल्याचे ज्ञात केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय,
    अंबाजोगाई सेवा केंद्राच्या वतीने आनंद सरोवर,वाघाळा रोड, अंबाजोगाई येथे पावनपर्व महाशिवरात्रीनिमित्त सामुहिक योग अभ्यास शिबीर व प्रवचनाचे 4 मार्च सोमवार रोजी आयोजन करण्यात आले होते.यावेळी ब्रम्हाकुमारी सुनिता बहेनजी “महाशिवरात्री आध्यात्मिक रहस्य" या विषयावर बोलताना म्हणाल्या की, महाशिवरात्री याचा अर्थ रात्र म्हणजे अंधार,हा अंधार अज्ञानाचा आहे, आपण सर्व मनुष्य आत्मा असून देह नाहीत.देह आला की, धर्म आला,धर्म आणि धारणा यांचा तणाव आला.परंतु महाशिवरात्री या पावन पर्वाच्या निमित्ताने परमपिता शिवपरमात्मा या धर्तीवर अवतरीत होवून ज्ञानाचा प्रकाश देवून सतत आठवण करून देतात की,तुम्ही सर्व आत्मा असून अजर,अमर व अविनाशी आहात व माझी लाडकी संतान आहात तुम्ही अज्ञानाच्या प्रभावाखाली जावून स्वतःला आत्मा न समजता पाच तत्वाचे बनलेले शरीर समजत आहात.जे की,विनाशी आहे.यामुळेच जगात अशांतता व प्रसंगी धार्मिक युद्धे होत आहेत.तेंव्हा राजयोगाभ्यासाच्या (मेडीटेशन) माध्यमातूनच मानवाचे कल्याण होईल.या बाबतचा ऊहापोह करुन याची उत्तरे सांगुन महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भाविक भक्तांना ज्ञान संपन्न केले व शेवटी सर्वांकडून राजयोगाभ्यास (मेडिटेशन) करवून घेतला.या कार्यक्रमातून समाजातील गरजु व्यक्तींसाठी आयुष्य समर्पित करा तर जीवन सफल होईल असा मौलिक संदेश दिला. याप्रसंगी केज मतदारसंघाच्या आ.प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे यांनी महाशिवरात्री पावन पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमास निमंत्रीत केल्याबद्दल आभार मानले. ‘आनंद सरोवरा'च्या भव्य वास्तु निर्माणासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. तर यावेळी माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी सध्याच्या ताण-तणावाच्या आयुष्यात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या माध्यमातून मानवाला सुख,शांती व समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी गावातील प्रतिष्ठित नागरिकांद्वारे दिपप्रज्ज्वलन व शिवध्वजारोहण करण्यात आले. सामुहिक योग अभ्यास, प्रवचन यासाठी मोठया संख्येने माता-भगिनी, बांधव आणि भाविक भक्त व सर्व जाती धर्मातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. सामुहिक योग अभ्यास (मेडिटेशन) शिबीरातून भाविक भक्तांना योग आभ्यासातून स्व-परिवर्तन,श्रेष्ठ संस्काराने संसार परिवर्तन, आत्मचिंतन आणि परमात्म्याच्या स्मरणाने आपल्या आंतरिक ऊर्जेचा विकास, मेडिटेशनद्वारा र्‍हदयरोग, डायबेटिज, ब्लडप्रेशर इत्यादी रोगांवर उपचार तसेच युवापिढीमध्ये आत्मविश्वासाची व नवनिर्माणतेची जागृती करण्याविषयी माहिती मिळाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार संयोजक जी.जी.रांदड यांनी मानले.महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी नगरसेवक कमलाकर कोपले, कंत्राटदार देवकते, होळंबे,श्री. बुरगे, डॉ.वैशाली पोतदार,आगळे गुरूजी आदींसहीत अंबाजोगाई शहर व परिसरातील ६०० ते ७०० स्त्री-पुरूष सहभागी झाले होते.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.