महाराष्ट्र राज्यमुंबईराजकारण

ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते जागतिक‍ महिला दिनी अस्मिता बाजार, अस्मिता प्लस योजनांचा शुभारंभ

जागतिक महिला दिन दोन सत्रात पार पडणार

मुंबई, दि.०६: जागतिक‍ महिला दिनी ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अस्मिता बाजार व अस्मिता प्लस योजनांचा शुभारंभ होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम, नरीमन पॉईंट, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य ऑडीटोरियममध्ये साजरा करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योग, खनिकर्म मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई हे राहणार आहेत. खासदार अरविंद सावंत आणि आमदार राज पुरोहित हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशातील महिलांसोबतच्या संवादाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अस्मिता बाजार, अस्मिता प्लस (अस्मिता सुधारीत नॅपकीन) या योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. उत्कृष्ट समुदाय संसाधन व्यक्तींचे मनोगत आणि ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता हे उपस्थित महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.

दुसऱ्या सत्रात शाश्वत उपजिवीका, आर्थिक समावेशन व शासकीय विभागांसमवेत समन्वय या विषयावर तज्ञ मान्यवरांकडून मार्गदर्शन तसेच सामाजिक समावेशन, क्षमता बांधणी, आर्थिक समावेशन या विषयावर आधारीत लघु चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे आर. विमला यांनी सांगितले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.