महाराष्ट्र राज्यमुंबई

महिला दिनी ‘अस्मिता बाजार’ योजनेचा मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

महिला बचतगट आता करणार ‘ऑनलाईन रिटेलिंग’

मुंबई, दि. ८ : ग्रामीण भागातील महिला बचतगटांना त्यांच्या उत्पादनांची आता ‘अस्मिता’ ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री करता येणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थ, लहान मुलांना लागणाऱ्या आवश्यक वस्तू, सौंदर्य प्रसाधने, घरगुती उपयोगी वस्तू, पशू खाद्य आदी साहित्याचीही या ॲपच्या सहाय्याने बचतगटांना रिटेलर म्हणून विक्री करता येणार आहे. आज जागतिक महिला दिनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला-बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते यासंदर्भातील ‘अस्मिता बाजार’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. प्ले स्टोअरवर यासाठीचे ‘अस्मिता ॲप’ उपलब्ध असून त्या माध्यमातून महिला बचतगटांना ई-कॉमर्सची संधी मिळाली आहे.

सॅनिटरी नॅपकीनसाठी ‘अस्मिता प्लस’ योजनेचा शुभारंभ

येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात महिलांना दर्जेदार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेचा शुभारंभही मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. अस्मिता प्लस हे फोल्डींग नसलेले, लिकप्रुफ टेक्नॉलॉजी असलेले व अधिक लांबीचे (२८० एमएम) सॅनिटरी नॅपकीन आहे. या सॅनेटरी नॅपकीनमुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचे रॅशेस येणार नाहीत व वापर कालावधीत ओलसरपणा जाणवणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. फक्त ५ रुपयांमध्ये ग्रामीण भागातील मुलींना हे सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होणार आहेत.

मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, महिला ह्या जोपर्यंत कुटुंबाचा आर्थिक आधार बनत नाहीत तोपर्यंत त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार नाही. यासाठीच ग्रामविकास आणि महिला-बालविकास विभागामार्फत बचतगटांच्या चळवळीला गती देण्यात आली आहे. राज्यात साडेतीन लाख बचतगट स्थापन झाले असून त्या माध्यमातून ४० लाख कुटुंबे उमेद अभियानाशी जोडली गेली आहेत. बचतगटांना फक्त पारंपारीक बाजारपेठेत अडकवून न ठेवता ई-कॉमर्सच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) बचतगटांची काही उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेद अभियानामार्फत ‘सरस महालक्ष्मी’ हे मोबाईल ॲप सुरु करण्यात आले आहे. आज सुरु करण्यात आलेल्या ‘अस्मिता बाजार’ योजनेच्या माध्यमातून बचतगटांची ऑनलाईन व्यापाराची चळवळ अजून गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता म्हणाले की, मासीक पाळीच्या काळात महिलांनी सॅनिटरी नॅपकीन वापरण्याचे प्रमाण फक्त १७ टक्के इतके आहे. येत्या काही काळात अस्मिता योजनेच्या माध्यमातून हे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आज सुरु करण्यात आलेल्या ‘अस्मिता प्लस’ योजनेतून ही चळवळ अधिक गतिमान होईल. ‘अस्मिता बाजार’ योजनेतून महिला बचतगटांना रोजगार मिळण्याबरोबरच ग्रामीण ग्राहकांना विविध वस्तू माफक दरात उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यावेळी म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिला आता ऑनलाईन व्यवहार, ई-कॉमर्स आदींमध्ये पारंगत होत आहेत. उमेद अभियानामार्फत यासाठी त्यांना विविध प्रशिक्षणे देण्यात येत आहेत. यासाठीच आज ‘अस्मिता बाजार’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांना मोठे ऑनलाईन मार्केट मिळेल. पहिल्या टप्प्यात पालघर, नाशिक, रायगड, पुणे, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, उमेद अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी रवींद्र शिंदे, उपसंचालक प्रकाश खोपकर, अनिल सोनवणे यांच्यासह बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.