‘राफेल कराराच्या कागदपत्रांची चोरी झालीच नाही’ ― महाधिवक्ता के.के वेणुगोपाल

नवी दिल्ली दि.०८ – राफेल करारासंबंधीची कागदपत्रे चोरीला गेल्याचे महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. यानंतर सर्व विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाल्यानंतर आता त्यांनी यु टर्न घेतला आहे. आता वेणूगोपाल यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ‘चोरी झालीच नाही’ असे म्हटले आहे. याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे मूळ गोपनीय कागदपत्रांच्या फोटोकॉपीज होत्या. गोपनीयतेचा भंग झाल्याचे न्यायालयाला सांगितल्याचे यावेळी ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान मला अशी माहिती मिळाली होती की राफेल करारासंबंधीची कागदपत्रे चोरीला गेली. संरक्षण मंत्रालयातून गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक झाली ती चोरीला गेल्यामुळे नाही तर, मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढण्यात आल्याने झाली, असा दावा त्यांनी केला आहे. संरक्षण मंत्रालयातून राफेल करारासंबंधीचे दस्तावेज चोरीला गेले नाहीत असे आता के. के. वेणुगोपाल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

बुधवारी वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, राफेल करारासंबंधीची महत्त्वाची कागदपत्रे हरवली आहेत. हे वक्तव्य समोर आल्यापासून विरोधक सरकारवर तुटून पडले होते. मात्र आता याचिकाकर्त्यांनी सदर कागदपत्रांच्या फोटोकॉपी कोर्टात सादर केल्या. ही कागदपत्रं हरवलेली नाहीत. तर, गोपनीयतेचा भंग झाला आहे, असा नवा दावा के. के. वेणुगोपाल यांनी केला. तसेच, मी यासंबंधीची माहिती दिलीच नाही व कागदपत्रे चोरीला गेल्याचे बोललोच नाही असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या राफेल करारासंबंधीच्या निर्णयाविरोधात वकील प्रशांत भूषण आणि यशवंत सिन्हा यांनी याचिका दाखल केली होती. त्यात फोटोकॉपीजचा समावेश होता. त्या गोपनीय कागदपत्रांच्या फोटोकॉपीज होत्या. त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाला, हेच आपण बोललो होतो, असे आता महाधिवक्ता वेणुगोपाल म्हणत आहेत. यामुळे आता कागदपत्रे गहाळ झाली की लीक झाली, हा नवा प्रश्न समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *