गेवराई तालुकाब्रेकिंग न्युज

राष्ट्रवादीने बारा किलोमीटरचा तरी रस्ता केला का? - ना. पंकजाताई मुंडे

 • भाजप सरकारमुळेच बीड जिल्हा विकासाच्या महामार्गावर

 • येडशी-औरंगाबाद महामार्गाचे गेवराईत झाले थाटात लोकार्पण

 • महामार्गामुळे मराठवाडयाच्या विकासाला गती - ना. नितीन गडकरींनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे साधला संवाद

गेवराई दि. ०९ : बीड जिल्हा हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा जिल्हा आहे, ही जाण केंद्र व राज्यातील भाजप सरकारला असल्यामुळेच कधी नव्हे तो कोट्यवधी रुपयांचा विकास निधी या जिल्हयात आला, रस्ते, रेल्वे व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठी कामे याठिकाणी झाल्याने हा जिल्हा विकासाच्या महामार्गावर आणण्यात आपल्याला यश मिळाले आहे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले. दरम्यान, मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषदेची आमदारकी वाटून जिल्हयाचे वाटोळे करणा-या राष्ट्रवादीने बारा किलोमीटर तरी रस्ते केले का? असा सवाल त्यांनी केला.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी यावेळी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे उपस्थित जनतेशी संवाद साधतांना महामार्गाच्या निर्मितीमुळे मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे नमुद केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक हजार ८७१ कोटी ३४ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या येडशी ते औरंगाबाद या २११ किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील बोरगाव- देवगाव लासुर स्टेशन रा.मा. ३९ या ५७ कोटीच्या व पैठण ते शहागड या २० कोटी रुपयांच्या रस्त्याची सुधारणा या दोन्ही कामांचे भूमिपूजन ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आज उत्साहात पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास खा. प्रीतमताई मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. लक्ष्मण पवार, आ.सुरेश धस, आ. भीमराव धोंडे,आ. आर.टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे , जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेश आडसकर, संतोष हंगे यांच्यासह विविध पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  यावेळी पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, २०१४ साली गडकरी यांच्याकडे रस्ते विकास खाते आले आणि त्यांनी प्रत्येक जिल्हयात हजारो कोटी रुपयांचे रस्ते दिले. या रस्त्यामुळे मराठवाड्यात विकासाची नवी पहाट उगवली.पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या जिल्ह्याचा विकास कधीच केला नाही. मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषद आमदारकी त्यांनी वाटली, जिल्ह्यात बारा आमदार दिले पण या बारा आमदारांनी बारा किलोमीटर तरी रस्ते केले का हा सवाल आपण त्या नेतृत्वाला केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्तेत कधी प्रशासकीय इमारती दिल्या नाहीत. रस्ते, पाणी,वीज यासाठी झगडावे लागले. लाख दोन लाख देऊन बोळवण केली जायची मात्र केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर हा जिल्हा गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा आहे याची सत्तेला जाण होती म्हणून जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला मिळाला. माझा जिल्हा कोल्हापूर, सांगली सारखा झाला पाहिजे यासाठी मी काम केले. रेल्वे ,रस्ते,प्रशासकीय इमारती तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी निधी मी आणला. जलयुक्त शिवार मधून पाण्याची टंचाई दूर केली. उज्ज्वला योजनेतून महिलांच्या डोळ्यातील धुराचा त्रास कमी केला. संपूर्ण स्वच्छता योजनेतून शौचालय उभारून स्वच्छता आणि आरोग्य सुधारले असेही पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.

  आम्ही शब्द पाळणारे

  आ. लक्ष्मण पवार यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी करणा-या कार्यकर्त्यांना उद्देशून पंकजाताई मुंडे यांनी आम्ही शब्द पाळणारे आहोत असे सांगितले. त्या म्हणाल्या, तुम्हीच तुमच्या आमदाराला कमी करीत आहात . बाप्पासाहेब पवार यांना त्यांच्या मुलाला आमदार करण्याचा शब्द लोकनेते मुंडे साहेबांनी दिला होता पण तो शब्द पंकजा मुंडेंनी पाळला आणि पहिले तिकीट जाहीर केले. माझ्या मनात कसलाही संकोच नाही. तुम्हीच मध्यंतरी कुणाला घरी बोलावले, सत्कार केले मी मात्र या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लक्ष्मण पवार यांच्या मागणीवरून निधी दिला, जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे असेही त्या म्हणाल्या.

  ना. नितीन गडकरी

  यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बोलताना केंद्रीय रस्ते विकास मंत्री गडकरी म्हणाले की, आज औरंगाबाद सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या औरंगाबाद ते येडशी टप्प्याचे लोकार्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे. या रस्त्याचे लोकार्पण झाल्याने हा महामार्ग आता मराठवाड्याच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यामुळे जोडला जाणार आहे. औरंगाबाद सोलापूर प्रवासासाठी हा रस्ता होण्यापूर्वी दहा तास लागत होते आता साडेचार तासात हे अंतर पूर्ण होणार आहे. मराठवाडा समृद्ध व्हावा त्याचा विकास व्हावा अशी आम्ही धोरणे राबवली.मराठवाड्याचा विकास रस्ते विकासाशिवाय शक्य नाही, त्यासाठी आम्ही एकूण ६१ हजार कोटीचा निधी मंजूर केला आहे. मराठवाड्यात यंदा दुष्काळी स्थिती आहे. जायकवाडी प्रकल्पात दरवर्षी ४० टक्केच्या वर पाणीसाठा होत नाही. त्यामुळे वाहून जाणारे पाणी दमनगंगा पिंजर प्रकल्प उभारून अडवले जात आहे.वाहून जाणारे पाणी अडवून ते पाणी गोदावरी नदीत सोडले जाईल ते पाणी जायकवाडी धरणात येईल व नगर, औरंगाबाद, बीड या दुष्काळी मराठवाडा भागास याचा फायदा होईल, यासाठी ९० टक्केनिधी केंद्राचे १० टक्के राज्य सरकार देणार आहे त्यातून या भागातील पाण्याचा प्रश्नही सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले.

  खा. प्रीतमताई मुंडे

  यावेळी बोलतांना खा. डाॅ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यात मागच्या चार वर्षांत ११ राष्ट्रीय रस्ते मंजूर करण्यात आम्ही यशस्वी झालो, त्यांची किंमत हजारो कोटीवर आहे. माझे राजकीय वय काढणाऱ्या विषयी मला सांगायचे आहे की, मी चार वर्षात जेवढे खऱ्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले तेवढ्या खोट्या कामाचे उदघाटन तुम्ही केले असावे टोदा त्यांनी विरोधकांना लगावला. परळीत सामूहिक लग्नात राष्ट्रवादीचा समारोप परळीत होईल असे मी म्हटले .मात्र हे वाक्य कुणाला तरी जास्त लागले.त्यावेळी तुमचा शेवट मी करणार नाही हे सांगण्यास मी विसरले. परळीत राष्ट्रवादी संपवण्याचे काम पंकजाताई मुंडे करणार आहेत. माझी लोकसभा उमेदवारी आणि प्रचार सुरू झाला आहे.पण विरोधक मात्र संगीत खुर्ची खेळत आहेत, त्यांचे डिपॉजिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही.

  यावेळी आ. सुरेश धस यांनीही आपल्या आवेशपूर्ण भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. प्रारंभी आ. लक्ष्मण पवार यांनी ना. पंकजाताई मुंडे व खा. प्रीतमताई मुंडे यांचे स्वागत केले. कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.