बीड दि.१६: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बीडमध्ये राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिल्याने पंडित समर्थक नाराज आहेत.अमरसिंह पंडित समर्थकांमध्ये फेसबुकच्या माध्यमाने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गेवराई येथे आज (शनिवार) संध्याकाळी आयोजित केलेली पक्षाची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली आहे.
अमरसिंह पंडित यांचे बंधू माजी जि.प अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या फेसबुक पोस्टने वातावरण अधिकच तापले आहे. ‘आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.’ अशी पोस्ट विजयसिंह पंडित यांनी सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर शेअर केली होती. त्यामुळे पंडित यांच्यातील नाराजी समोर आली आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची गेवराई येथे होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.
कटू सत्य…!!! pic.twitter.com/iXg9Qh0puc
— Vijaysinh Pandit (@VijaysinhPandit) March 15, 2019
लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली आहे. ज्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. बीडमधून राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित, जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याने त्यांच्या नावाची चर्चा मावळली.
तर अमरसिंह पंडित यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र बजरंग सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने अमरसिंह पंडित गटाला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे.बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे निष्ठावंत असल्याने त्यांना तिकीट मिळाले असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.