सोयगाव,दि.२०:ज्ञानेश्वर डी.पाटील―
कोविड-१९ च्या सलग चौथ्या लॉकडाऊनमधून खरिपाच्या हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागात शेती विषयक कामांसाठी सूट देण्यात आल्याचे आदेश व नियमावली बुधवारी सोयगावला प्राप्त झाली आहे.त्यामुळे कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमध्ये आता शेतकऱ्यांवर लॉकडाऊनचे उल्लंघन म्हणून गुन्हे दाखल होणार नाही असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या सूट मधून जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेती विषयक कामांसाठी सूट देण्यात आली असून सर्व कृषी विषयक उपक्रम व शेतीचे कामे पूर्णपणे सुरु राहतील असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे खरिपाच्या हंगामाच्या पूर्वतयारीला शेतकऱ्यांना आता कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.कोविड-१९ चा विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आल्यावरून औरंगाबाद जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४(१)(३)प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.परंतु शासनाच्या दि.४ मे च्या पत्रान्वये खरीप हंगाम २०२० साठी औरंगाबाद जिल्ह्यात कृषिविषयक कामांसाठी लॉकडाऊन मधून सूट देण्यात आली आहे.खरीपाचा हंगाम जवळ येवून ठेपला असल्याने शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी मॉन्सूनपूर्व तयारी करणे आवश्यक आहे.लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेवून शेती विषयक बाबींना सूट देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी घेतला आहे.यामध्ये खालीलप्रमाणे आस्थापना सुरु ठेवण्यास मनाई आदेश दूर करण्यात आला आहे.
या बाबींना लॉकडाऊन मधून सूट-
१)शेतकरी व शेतमजुरांमार्फत शेतात केली जाणारे कामे
२)कृषी साहित्याची विक्री करणारी केंद्रे,सिंचानाशी संबंधित साहित्याची विक्री करणारे दुकाने त्यांचे सुटे भाग व पुरवठा करणारी साखळी सुरु राहील
३)खते,कीटकनाशक,बी-बियाणे आणि इतर कृषी विषयक साहित्य विक्री करणारी दुकाने
४)कापणी व पेरणी संबंधातील यंत्रे विक्री
५)विविध कृषी आदाने खते,बी-बियाणे बांधावर पोहचविण्यासाठी करण्यात येणारी कामे
६)शीतगृहे आणि गोदामे यांची सेवा
७)कृषी यंत्र सामुग्रीची दुकाने
दिलेल्या आदेशात मजुरांना तोंडाला मास्क,सामाजिक अंतरे पाळणे बंधनकारक राहणार असून दुकानदारांनी वेळेचे बंधन व निर्गमित करण्यात आलेले आदेश,सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.