अंबाजोगाई: राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये सरळ सेवेने शिपाई पदावर रूजू झालेल्यांना पदोन्नतीपासुन वंचितच रहावे लागत आहे. शिपाई वर्गासाठी प्रचलित जुन्या सेवा प्रवेश नियमामुळे सरळ सेवेने रूजू झालेल्या शिपाई वर्गावर मोठा अन्याय होत आहे.जे कर्मचारी अनुकंपातून शिपाई संवर्गात रूजू होतात.त्यांच्यासाठी शासनाने वेगळे सेवा प्रवेश नियम लावलेले आहेत.त्यामुळे अनुकंपातुन रूजू झालेल्या कर्मचार्यांना सेवेतील 4 ते 5 वर्ष पुर्ण होताच त्यांचे समायोजन त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वरिष्ठ सहाय्यक, आरोग्यसेवक, ग्रामसेवक,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विस्तार अधिकारी कृषि, पंचायत,सांख्यिकी, शिक्षण तसेच कनिष्ठ अभियंता पदावर केले जाते.हा फायदा सरळ सेवेने रूजू झालेल्या शिपाई वर्गाला होत नाही.त्यामुळे सरकार आपल्यावर एक प्रकारे अन्याय करत आहे. अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे सरळ सेवेने शासकीय सेवेत रूजू झालेल्या शिपाई वर्गावरील अन्याय तात्काळ दुर करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
संघटनेच्या वतीने नमुद करण्यात आले आहे की,सरळ सेवेने रूजू झालेल्या शिपाई वर्गाच्या पदोन्नती बाबत संघटनेने सातत्याने शासनाकडे विविध माध्यमातून पाठपुरावा केला आहे.ग्रामविकास विभागाला निवेदनेही दिली आहेत.तरीही शासन सकारात्मक विचार करत नसल्याने काही दिवसांपुर्वी सोलापुर जिल्हा परिषदेतील वर्ग 4 कर्मचार्यांनी प्रशासनाकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागीतल्याचे कळते या बाबतच्या बातम्या तेथील वर्तमानपत्रात प्रसिद्धही झाल्या आहेत.त्यामुळे आता अनुकंपाकर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रमाणेच सरळ सेवेने सेवेत रूजू झालेल्या शिपाई वर्गातील कर्मचार्यांना सुद्धा शैक्षणिक पात्रतेनुसारच पदोन्नती मिळावी अशी मागणी होत आहे.त्या करिता महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाच्या सेवा प्रवेश नियमात योग्य बदल करावा सदर मागणी मान्य झाली नाही तर संघटना मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद बीड येथे सन 2005 पासुन अनुकंपातुन शिपाई या संवर्गात सेवेत रूजू झालेल्या जवळपास 178 कर्मचार्यांचे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वरिष्ठ सहाय्यक आरोग्य सेवक,ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,विस्तार अधिकारी कृषि, पंचायत,सांख्यिकी, शिक्षण तसेच कनिष्ठ अभियंता अशा पदांवर वर्ग 3 पदांवर समायोजन झाले आहे. ग्रामपंचायत मधील शिपाई संवर्गातील जपळसपास 100 कर्मचार्यांचे वरिष्ठ सहाय्यक,आरोग्य सेवक,ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा वर्ग 3 पदांवर समायोजन झाले आहे.तर सरळ सेवेने सेवत रूजू झालेल्या शिपाई संवर्गातून केवळ 30 कर्मचार्यांची पदोन्नती झालेली आहे. ही अन्यायकारक बाब आहे.त्यामुळे या प्रश्नी लवकरात लवकर न्याय मिळावा अन्यथा आंदोलन करू अशी भूमिका महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी संघटनेने घेतली आहे.