पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

बजरंगबप्पांच्या उमेदवारीचा निर्णय झाला आता तयारीला लागा ―अमरसिंह पंडित

सोनवणेंसारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली―धनंजय मुंडे

आठवडा विशेष | प्रतिनिधी

पाटोदा दि.१६: बजरंग बप्पा सोनवणे यांच्या उमेदवारीचा निर्णय झाला आहे, आता तयारीला लागा घड्याळ हाच उमेदवार समजुन बजरंग बप्पा यांना विजयी करा असे आवाहन माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी करीत आपण उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या सर्वच चर्चांना आज चोख प्रत्युत्तर दिले. बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, आमचा विश्वास आहे की, आमचा हा उमेदवार मॅच विनर असेल, असा शंखनाद करत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.

बीड लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या तालुकानिहाय बैठकांना आज पाटोदा येथून सुरूवात झाली. पाटोदा नंतर आष्टी आणि रात्री शिरूर येथील बैठकीमधूनही कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात उपस्थित राहत निवडणुकीच्या प्रचाराचा एक प्रकारे आरंभ केला.

पक्षाचा आदेश मला अंतिम- अमरसिंह पंडित

काल बीड लोकसभेची उमेदवारी बजरंग बप्पा सोनवणे यांना जाहीर झाल्यानंतर अमरसिंह पंडित हे नाराज असल्याच्या काही लोकांनी वावड्या उठवल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर अमरसिंह पंडित आजच्या बैठकांमधुन काय बोलतात याकडे लक्ष लागले असताना मला पक्षाचा आदेश अंतिम आहे, दिलेला शब्द हा अमर पाळतो. बीड जिल्हा पवारांवर विश्वास ठेवणारा आहे. पक्षाचा निर्णय झाला आता कामाला लागा असा आदेशच कार्यकर्त्यांना देत उमेदवारीवरून उठलेल्या वावड्यांना चोख शब्दात प्रत्युत्तर दिले.

दबंग होता तर प्रकल्प लातूरला का गेला ? ―धनंजय मुंडे

या बैठकीत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, बीडच्या जनतेने एका घराला भरपूर दिले मात्र बीडकरांना काय मिळाले ? 5 पाच वर्षात एकदाही न दिसलेल्या खासदाराचा निधीही खर्च करू शकल्या नाहीत तर त्या दबंग कशा ? दबंगाई होती तर 10 हजार कोटींचा प्रकल्प लातूरला जाऊच का दिला ? म्हणुनच आता सामान्य कुुटुंबात आणि शेतकर्‍यांशी नाळ जोडलेला व्यक्तीच खासदार होणार असा विश्वास व्यक्त केला.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  मोदींनी फक्त फसवले―प्रकाशदादा सोळंके

  शेतमालाचा भाव पाडण्याचा चमत्कार करणार्‍या मोदी सरकारने केला. घोषणा अनेक केल्या कृतीत मात्र फसवले, अशा शब्दात माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी टिका करताना आष्टी, पाटोद्यात साखर कारखाना उभे करायला इथल्या माजी मंत्र्याला जमले नाही, ते बजरंग बप्पा सारख्या सामान्य कार्यकर्त्यांने करून दाखवले, असेही ते म्हणाले.

  मी जनतेचा पाईक- बजरंग बप्पा सोनवणे

  पक्षाने दिलेली उमेदवारी जनतेच्या ताकदीवर पेलण्यास मी तयार असून, जनतेचा पाईक म्हणुन जिल्हा वासियांच्या प्रश्नांवर आवाज उठवेल त्यासाठी आशीर्वाद द्या असे आवाहन उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केले.

  चारा छावण्यांना न्याय न देणारे जिल्ह्याला काय न्याय देणार ? असा सवाल जि.प.सदस्य सतिश आबा शिंदे यांनी उपस्थित केला, तर शेतकर्‍यांची जाण असणार्‍या शेतकरी पुत्राचा मागे उभे रहा असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब आजबे यांनी केले. जातीवादी पक्षाला थारा न देण्याचे आवाहन माजी आ.सय्यद सलीम यांनी केले. भाजपाचा टांगा पलटी करण्याचा निर्धार माजी सभापती महेंद्र गर्जे यांनी व्यक्त केला तर रात्रीचा दिवस करा आणि घड्याळ हेच चिन्ह समजुन निवडणुक लढवा असे आवाहन महिला जिल्हा अध्यक्षा सौ.चंपावती पानसंबळ यांनी केले.

  या बैठकीय गुलाबराव घुमरे, जयसिंग सोळंके, अ‍ॅड.एन.एल. जाधव, अप्पासाहेब राख, जुबेरभाई चाऊस, बाबासाहेब शिंदे, इक्बाल पेंटर, कॉ.महोदव नागरगोजे, शिवभूषण जाधव, गणेश कवडे, दादासाहेब मुंडे, श्रीहरी पवार, गणेश भोसले, काकासाहेब शिंदे, शिवाजी पवार, सुनिल काळे, विठ्ठल सानप, सुवर्णाताई शिंदे आदी उपस्थित होते.

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.