निलंगा(लातूर) दि.१७: सोशल मीडीयावर मात्र हलगरा पाणीदार असल्याचे दाखवण्यात येत आहे.परंतु येथील परिस्थिती पाहता येथे पाण्यासाठी महिलांना दूरवर भटकंती करावी लागते.पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून येथील महिला, पुरुषांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
हलगरा गावातील जनता गेल्या दीड महिन्यापासून भिषण पाणी टंचाईस तोंड देत आहे. दिवस-रात्र पाणी मिळवण्यासाठी त्याची भटकंती होत आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाणी व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने कोणताही ठराव घेतला नाही तसेच गावात भरपूर पाणी आहे असे सोशल मीडियावर वारंवार दाखवण्यात आले. प्रत्यक्षात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांस एक महिन्यापासून पाणी मिळत नाही.
शाळेतील विहिरीला पाणी असताना बोअरवेल चालू करण्यासाठी कोणताही प्रयत्न ग्रामपंचायतीकडून केला जात नाही. पाण्याची टंचाई असताना रस्ते व शाळा दुरुस्तीचे काम चालू आहे त्यास अपुरे पाणी मिळत असल्यामुळे काम मजबूत होईल का? असा प्रश्न गावकऱ्यांस पडत आहे. २५ मार्चपर्यंत पाण्याची व्यवस्था न केल्यास गावकरी ग्रामपंचायत समोर उपोषणास बसतील, असे सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे.