राष्ट्रवादीच्या केज येथील मेळाव्यापासून ‘मुंदडा गट’ दूर राहण्याची शक्यता ?

केज (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक महिन्यावर आली तरी बीड राष्ट्रवादी समोरील अडचणी काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. अमरसिंह पंडित यांना डावलल्याचा वाद शमतो न शमतो तोच मुंदडा गटाची नाराजीही अद्याप दूर झाली नसल्याने आज रविवारी रात्री केज येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यापासून मुंदडा गट अलिप्त राहण्याची चिन्हे दिसत असल्याचे सूत्रांकडून कळते.

मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची सल मुंदडा गटास कायम आहे. इतर कारणांसोबतच पक्षांतर्गत विरोधकांनी देखील नमिता मुंदडा यांच्या पराभवास मोठा हातभार लावला. बजरंग सोनवणे गटानेही विरोधात काम केल्याचा दावाही मुंदडा यांच्याकडून केला जातो. हा पराभव पचवून त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार यांना दिलेल्या शब्दाचा मान राखत पूर्णपणे सोनवणे यांना मदत केली, परंतु निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा आमच्या गटाचे खच्चीकरण केल्याचा मुंदडा यांचा आरोप आहे. त्यामुळे यापुढे पक्षाचे काम करावयाचे असल्यास केज मतदार संघाची पूर्ण जबाबदारी आमच्याकडे द्यावी, त्यात इतरांचा हस्तक्षेप नको अशी प्रमुख अट मुंदडा यांनी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवली. त्यांनतर राष्ट्रवादीच्या परळी येथे पार पडलेल्या परिवर्तन निर्धार मेळाव्याच्या वेळी केज मतदार संघातील सर्व सूत्रे देण्याचे आश्वासन देऊन मुंदडा गटाला विश्वासात घेण्यात आले. या आश्वासनावर विश्वास ठेवत नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले. अवघ्या एका रात्रीतून पाचशे वाहनांची तरतूद करत केज मतदार संघातून हजारो कार्यकर्ते परळीच्या मेळाव्यास नेण्यात मुंदडा पिता-पुत्र यशस्वी ठरले.

अंबाजोगाई आणि केजचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच इतर महत्वाची पदे स्वतःच्या विश्वासातील कार्यकर्त्यांना देण्यासाठी मुंदडा इच्छुक आहेत. सध्या या सर्व पदांवर बजरंग सोनवणे यांच्या गटातील व्यक्ती आहेत. परंतु, मेळावा संपला तरी केज मतदार संघाची सूत्रे अद्याप पूर्णपणे मुंदडा यांच्याकडे देण्यात आली नाहीत. त्यामुळे आपली फसगत झाल्याची भावना मुंदडा गटाची आहे. त्यांची नाराजी लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना परवडणारी नाही. केज तालुका हेच सोनवणे यांचे बलस्थान आहे. मात्र, याच तालुक्यात मुंदडा गटाची नाराजी सोनवणे यांच्यासाठी प्रचंड नुकसान करणारी असेल. त्यामुळे सायंकाळपर्यंत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात आणि मुंदडा कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.