माजलगाव: जिल्ह्यातील सामान्य शेतकर्‍याच्या मुलाला देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवा- धनंजय मुंडे

स्वतःसाठी करायचे ते सर्व बजरंगबप्पांसाठी करेल- अमरसिंह पंडित

आघाडीच्या उमेदवारासाठी नेत्यांनी जिल्हा पिंजुन काढला

माजलगाव.दि.१७: एकीकडे ज्यांना खरीप आणि रब्बी या पिकांमधील फरक समजत नाही, आणि स्वतःचा वारसा हक्काने मिळालेला वैद्यनाथ कारखानाही नीट चालवता येत नाही, ते जिल्ह्याचे खासदार, मंत्री आहेत, तर दुसरीकडे बजरंग सोनवणे सारख्या सामान्य शेतकर्‍याच्या मुलाने स्वतःच्या कर्तृत्वावर साखर कारखाना उभारून शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती घडवण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे या वेळी शेतकर्‍यांच्या भल्यासाठी सामान्य शेतकर्‍याच्या मुलाला देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवा असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

बीड लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ मागील दोन दिवसांपासून आघाडीच्या नेत्यांनी सुरूवातीच्या टप्प्यातच संपुर्ण बीड जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पिंजुन काढला. रविवारी माजलगाव, वडवणी, धारूर आणि केज येथील बैठकांनाही मोठा प्रतिसाद मिळाला, त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. महागाईच्या नावाखाली मोदींनी त्यांच्या अंधभक्तांनाही लुटले आहे. पाच वर्षात सर्वाधिक बेरोजगारी निर्माण करत मोदी सरकारने एक पिढी बरबाद केली आहे. राज्य घटना जाळणारे हेच लोक पुन्हा निवडुन आले तर यानंतर निवडणुका होतील का नाही अशी शंका व्यक्त करीत स्वतःच्या नावापुढे चौकीदार लावुन मैं भी चौकीदार म्हणत प्रामाणिकपणे काम करणार्‍या चौकीदारांनाही मोदी बदनाम करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

भैय्यासाहेबांचा अभिमान वाटतो

उमेदवारीचा निर्णय झाला त्याच्या दुसर्‍या क्षणाला भैय्यासाहेब पंडित निधड्या छातीने कामाला लागले आहेत. ही राष्ट्रवादी परिवाराची शिकवण आहे, त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो अशा शब्दात धनंजय मुंडे यंानी अमरसिंह पंडितांचे कौतुक केले.

स्वतःप्रमाणे काम करू- अमरसिंह पंडित

यावेळी बोलताना माजी आ.अमरसिंह पंडित म्हणाले की, भाजपच्या लोकांनी आमची काळजी करण्याचे कारण नाही, भावनेच्या भरात कोणी काही बोलले असेल पण दिलेला शब्द शिवछत्र परिवार कधीही खाली पडु देणार नाही, पक्षाने निर्णय केला त्यावर आता चर्चा नाही. स्वतःसाठी जे काय करायचे होते ते बजरंग साठीही करणार असल्याचे सांगतानाच आदरणीय शिवाजीराव दादांनी आपल्याला हाच आदेश दिल्याचे ते म्हणाले.

माजलगावचे आमदार बोलके पोपट- प्रकाशदादा सोळंके

माजलगावचे आमदार हे बोलके पोपट आहेत, निवडणुक आली म्हणुन त्यांना माजलगावची आठवण आली, अशा शब्दात माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यंानी आर.टी.देशमुख यांच्यावर टिका करताना भाजपाने राष्ट्रवादीची काळजी करण्यापेक्षा स्वतःचा उमेदवार विद्यमान खासदारच असतील का ? याची काळजी करावी, असा टोला लगावला.

मुस्लिम समाजाची फसवणुक झाली- सय्यद सलीम

यावेळी माजी आमदार सय्यद सलीम यांनी मोदींनी मुस्लिम समाजाबरोबरच सर्व समाजाची फसवणुक केल्याचा आरोप करून जातीवादी पक्षांना रोखण्याची लोकसभा निवडणुक हीच खरी वेळ असल्याचे सांगितले.

शेतकर्‍यांच्या पीक विम्यावर डी.सी.सी. बँकेत मलिदा खाणार्‍यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत असे सांगताना भाजपा उमेदवाराकडे आर्थिक आशिर्वाद आहेत, माझ्या मागे फक्त आई-वडीलांची पुण्याई, कार्यकर्त्यांची साथ असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच नारायण गवळी यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाला.

या बैठकीस माजी आ.पृथ्वीराज साठे, कॉंग्रेसचे दादासाहेब मुंडे, चंपाताई पानसंबळ, अशोकआबा डक, जयसिंग सोळंके, चंद्रकांत शेजुळ, प्रकाश गवते, शरद चव्हाण, दयानंद स्वामी, विश्‍वांभर थावरे, जयदत्त नरवटे, वसंतराव घाटुळ, डॉ.वसीम मनसबदार, दिपकराव जाधव, कचरूतात्या खळगे, मनोहर डाके, नारायण होके, राजेश घोडे, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.