बीड : ‘त्या’ मेळाव्याकडे मुंदडा फिरकलेच नाही

पक्षश्रेष्ठींनी केज मतदार संघाची पूर्णपणे जबाबदारी देण्याचा शब्द पाळला नसल्याने मुंदडा नाराज

केज दि.१८ : रविवारी रात्री केज येथील तिरुपती मंगल कार्यालयात बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराच्या पूर्वतयारीसाठी बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, उषा ठोंबरे, सय्यद सलीम, काँग्रेसचे आदित्य पाटील इत्यादी प्रमुख उपस्थित होते. परंतु, ‘चर्चा झाली ती मुंदडा पिता-पुत्रांच्या गैरहजेरीची’ पक्षश्रेष्ठींनी केज मतदार संघाची पूर्णपणे जबाबदारी देण्याचा शब्द पाळला नसल्याने मुंदडा नाराज आहेत. विधानसभेतील पराभवानंतर मुंदडा यांनी स्वतःला जनसंपर्कात पूर्णपणे झोकून दिले आहे. कोण आपला, कोण विरोधक हे न पाहता त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभाग घेतला. सत्ता नसतानाही अनेकांच्या अडचणी सोडविल्या, विविध प्रश्न मार्गी लावले. त्यांच्या मेहनतीची फळे आता दिसत असून केज मतदार संघातील जनता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र आहे. परंतु, राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीतून सतत होणाऱ्या विरोधामुळे मुंदडा त्रस्त आहेत. त्यासाठीच त्यांनी केज मतदार संघाची सूत्रे पूर्णपणे देण्याची मागणी केली होती. अद्याप हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मुंदडा यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. आधीच गटबाजीने पोखरलेल्या राष्ट्रवादीस मुंदडा यांच्या नाराजीमुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून कळते.

तर दुसरीकडे धनंजय मुंडेंचा सारवासारव करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचा केजमध्ये मेळावा सुरु असताना नंदकिशोर मुंदडा मतदार संघातील एका धार्मिक कार्यक्रमात होते ते अक्षय मुंदडा मुंबईत होते. मात्र, अक्षय मुंदडा प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्याचे सांगत धनंजय मुंडे यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.