अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात अंबाजोगाई येथील बुट्टेनाथ दरी खोरे परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रांवर रविवार,दि.17 मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून तब्बल तीन लाख दहा हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट केला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे.तसेच धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने धाडी टाकण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथील बुट्टेनाथ दरी खोरे परिसरात हातभट्टी दारू केंद्रांवर गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली.
यात दारू तयार करण्याचे 13 हजार 955 लिटर रसायन,20 लिटर तयार हातभट्टी दारू,67 बॅरल,37 डब्बे,एक प्लास्टीक कॅन,18 टोपली यासह एकुण मिळून सुमारे तीन लाख दहा हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो तात्काळ नष्ट करण्यात आला.या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,दुय्यम निरीक्षक ए.एन.पिकले, ए.बी.शेळके, कॉन्स्टेबल बि.के.पाटील, आर.ए.जारवाल, एस.व्ही.लोमटे व वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.