मुंबई: राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे अशी माहिती मिळत आहे. मुलगा डॉ सुजय विखे याने भाजपा प्रवेश केल्यापासूनच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. पण आपण राजीनामा देणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं. पण अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र राष्ट्रीय काँग्रेसच्या हायकमांडकडून विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यांच्या राजीनाम्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
मुलाने भाजपात प्रवेश केला म्हणून मी विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा देणार नाही. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं होतं.
अहमदनगरच्या जागेबाबत आघाडीचा कुठलाही निर्णय झाला नव्हता, अशा वेळी शरद पवारांनी आमचे वडील बाळासाहेब यांच्याबाबत केलेले विधान दुर्देवी होत. याचं मला व्यक्तिशः वाईट वाटलं. आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिपण्णी करणे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारे नव्हते. पवारांचे हे विधान आल्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते.