ना. पंकजाताई मुंडे यांची बीबीसी मराठी वाहिनीवर धुवांधार बॅटींग
मुंबई दि. १९(वृत्तसंस्था): माझ्या घरात ज्यादिवशी विरोधी पक्षनेते पद दिले गेले त्याचवेळी पुढच्या पाच वर्षात काय होणार हे मला कळून चुकले होते, याचाच परिणाम म्हणून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये वारंवार जे अमृत मंथन व्हायचे त्यातील आरोपांचे हलाहल (विष) प्राशन करण्याचे काम माझ्या वाट्याला आले, माझ्या विषाची परिक्षा तेंव्हा संपेल जेव्हा काही पक्ष संपलेली असतील असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे आज एका मुलाखतीत बोलतांना सांगितले.
बीबीसी मराठी वाहिनीने राष्ट्र-महाराष्ट्र या कार्यक्रमात ना. पंकजाताई मुंडे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चौफेर मुलाखत घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. या चर्चे दरम्यान विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी तितक्याच सहजतेने व अभ्यासपूर्ण उत्तरे देत धुवांधार बॅटींग केली.
विरोधक तुमच्यावर वारंवार आरोप करतात? या प्रश्नांवर बोलतांना त्या म्हणाल्या की, सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत असताना माझ्यावर विरोधी पक्षांकडून सातत्याने आरोप झाले. मी गोपीनाथ मुंडेंसारख्या धाडसी नेत्याची मुलगी असल्याने त्या आरोपांना तितक्याच धाडसाने सामोरे गेले. ज्यावेळी माझ्या घरात विरोधी पक्षनेते पद आले त्याचवेळी माझ्या लक्षात आले होते की पुढे काय होणार? सरकार आणि विरोधी पक्ष याच्या अमृत मंथनातून आरोपांचे जे विष निघत होते ते कुणी प्यावे असा प्रश्न ज्यावेळी समोर आला त्यावेळी ते विष माझ्या वाट्याला आले. ही विषाची परिक्षा तेव्हा संपेल जेव्हा काही पक्ष संपतील.
शिवसेने सोबतची युती विचाराची
भाजप आणि शिवसेनेची युती ही एका विचारांवर आधारलेली आहे. गेली पंचेवीस वर्षाचा आमचा संसार आहे. आम्ही एका विचाराने समरस होऊन काम करतो. सापा-मुंगसासारखे आमचे वैर नाही, आम्ही चांगले जुने मित्र आहोत. मुख्यमंत्री होणे तुम्हाला आवडेल काय? यावर बोलतांना त्या म्हणाल्या की, युतीचा मुख्यमंत्री व्हावा हे मला जास्त आवडेल आणि त्यासाठी मी जीवाचं रान करेल. मुख्यमंत्री होण्याची नाही तर मुख्यमंत्री बनविण्याची ताकद माझ्यात असावी असे मला वाटते.
पुन्हा मोदींचेच सरकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विविध क्षेत्रात चांगले काम करून देशाला सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विकासाची नवी दिशा देण्याचे काम करतांना स्वच्छता अभियान, उज्वला गॅस, सौभाग्य, जनधन योजना आदी योजना यशस्वीपणे राबवून सर्व सामान्य जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे. दुर्दैवाने आपल्या देशात प्रत्येक गोष्टीत राजकारण होत असल्याने सर्व विरोधक एकत्र येवून मोदींना विरोध करत आहेत. देशाच्या सुरक्षेबाबत मोदींनी तडजोड केली नाही. आतापर्यंत आपण सहिष्णू वागलो पण आता हे चालणार नाही हे ओळखून त्यांनी शत्रू राष्ट्राला आक्रमक उत्तर दिले आहे. २०१४ साली मोदी लाटेचा परिणाम राज्यात सरकार येण्यावर झाला असल्याचे सांगून चांगले काम करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे हे आमचे प्रथम कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या.
सध्याच्या सोशल मिडियाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, सध्या मी सोशल मिडियावर फारशी अॅक्टीव्ह नसते. अलिकडे याचा दुरूपयोग जास्त होत आहे. सोशल मिडियामध्ये माझी प्रतिमा उंचावण्याचे काम होत असताना इतरांची प्रतिमा खराब होणार नाही याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. विशेषतः महिलांच्या बाबतीत ही काळजी घेणे आवश्यक आहे. विषयांवर किंवा विचारांवर टीका व्हावी पण व्यक्तीवर नको असे त्या म्हणाल्या. यावेळी गोहत्या, हिंदूत्व, राम मंदिर, धनगर आरक्षणाचा प्रश्न, घराणेशाही आदी विविध विषयांवरील प्रश्नांवर त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.