जंगी स्वागत..उत्स्फूर्त प्रतिसाद अन आपुलकीचा संवाद
केज दि.१९: जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज संवाद दौऱ्यानिमित्त केज तालुक्यातील विविध गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. दौऱ्याच्या सुरुवातीला गोपीनाथ गड येथे जाऊन लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन त्यांनी दौऱ्याला सुरवात केली.
खा.प्रितमताई मुंडे यांनी आज तालुक्यातील मांग वडगांव, सातेफळ, हदगांव, भोपळा, डोका, सारूकवाडी, चिंचोली माळी, वरपगांव आदी ठिकाणी दौरा केला. प्रत्येक गावांत त्यांचे ढोलताशाच्या गजरात जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले तसेच माताभगिनींनी त्यांचे औक्षणही केले. यावेळी ग्रामस्थांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधतांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवलेल्या विविध विकासाभिमुख योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली.यावेळी आ.संगीताताई ठोंबरे , जि.प. चे समाजकल्याण सभापती संतोष हंगे , पं. स. सदस्य संदीप पाटील. सुनील गलांडे, विष्णू घुले आदी उपस्थित होते.
महिला भगिनींनी दिला विजयाचा आशीर्वाद
चिंचोली माळी जि. प. गटातील गावांना संवाद दौऱ्यानिमित्त भेटी देत असताना ठिकठिकाणी महिला भगिनींनी खा.प्रितमताई मुंडे यांचे औक्षण करत असताना ‘ताई तुम्हीच विजयी होणार आहात” असे आशीर्वाद दिले. संवाद दौऱ्यातील कार्यक्रमांना महिलांची विशेष लक्षणीय उपस्थिती होती.