‘माणिक-मोती’ ग्रंथाचे अंबाजोगाईत प्रकाशन
अंबाजोगाई (प्रतिनिधी): शिक्षणाबरोबर दिशा देणारे लोकही हवेत.जे प्राप्त केले आहे.ते समाजासाठीच आहे ही भूमिका घेवून कार्य करणारे समर्पित व्यक्तीमत्व,आदर्श शिक्षक व स्वयंसेवक म्हणुन मा.मा.क्षीरसागर यांच्या ग्रंथ रूपाने संकलीत केलेल्या आठवणी या प्रेरणा देणार्या आहेत. परिवारातील प्रत्येक व्यक्ती ही समाजाशी बांधिलकी जोपासणारी आहे.तडजोड न करता ध्येयाकडे वाटचाल करणे,जे हाताशी व सोबत आहेत.त्यांना घेवून पुढे जाणे हे करत मामांनी भा.शि.प्र संस्थेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा व राष्ट्रीयत्वाचा विचार समाजात रूजविला.हा विचार पुढे नेण्यासाठी मा.मां.नी भा.शि.प्र संस्थेला साधन बनवून अनेक स्वयंसेवक घडविले अशा समर्पित व्यक्तीमत्वांमुळे सामान्य माणसात देशभक्ती जागृत झाली.काळाला सुसंगत व्यवस्था कार्यरत असल्यानेच हा देश एकसंघ राहिला समर्पित,ध्येयनिष्ठ व राष्ट्रभक्त व्यक्तींना जोडणारे भा.शि.प्र.हे संस्कार केंद्र योग्य दिशेने समाजपरिवर्तन करणारे आहे.नावाला साजेसे काम करून मा.मा.क्षीरसागर यांनी आपले आयुष्य समर्पित केल्याचे सांगुन साधनेच्या रूपात कला विकसित झाल्या तरच संस्कृती रूजेल व टिकेल असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.
मंगळवार,दि.19 मार्च रोजी अंबाजोगाईत खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात स्व.मा.मा.क्षीरसागर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणा-या ‘माणिक-मोती’ या स्मृतीग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी पद्मभुषण डॉ.अ.ल.कुकडे (पुर्व संघचालक,पश्चिम क्षेत्र),मधुकरराव जाधव (प्रांत संघचालक, देवगिरी प्रांत) आणि डॉ.सुरेंद्रजी आलुरकर (अध्यक्ष,भा.शि.प्र. संस्था,अंबाजोगाई) या मान्यवरांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी दिपप्रज्वलन व ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.मान्यवरांचा परिचय प्रा.सतिष हिवरेकर यांनी करून दिला.क्षीरसागर परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रम आयोजनाबाबतची भूमिका विषद करताना माजी प्राचार्य अ.द.पत्की यांनी,मामा क्षीरसागर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा आणि भारतीय शिक्षण संकल्पनेवरील महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञांचे चिंतनपर लेख असलेला,मा.मां.चे समकालीन सहयोगी, विद्यार्थी व कुटुंबिय यांच्या आठवणींनी समृद्ध झालेला ‘माणिक -मोती’ स्मृतीग्रंथ साकार झाला आहे.हा ग्रंथ युवा पिढीला निश्चितच पथदर्शक प्रेरणास्त्रोत ठरेल असा विश्वास व्यक्त केला.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘माणिक-मोती’ या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी चित्रफितीद्वारे ग्रंथ निर्मिती प्रक्रियेची माहिती,मुलाखतींचा सारांश,उपस्थितांसमोर ठेवण्यात आला.यात पद्माकर देशपांडे, वसंतराव देशमुख, प्रा.शरदराव हेबाळकर, प्रा.रंगनाथ तिवारी, प्रा.रा.गो.धाट,रामचंद्र पाटोदकर, डॉ.द्वारकादास लोहिया, व्यंकटराव देशपांडे, प्रा.शैला लोहिया, प्रा.मधुकरराव इंगोले, निकम गुरूजी,भास्कर मुंडे,पद्मभुषण अ.ल.कुकडे,मधुकर जाधव आदींनी मा.मा.क्षीरसागर यांच्या विविध आठवणींचे स्मरण या प्रसंगी केले. “माणिक मोती” ग्रंथ निर्मितीमध्ये सहकार्य करणारे माणिक जैन, अनंत मसने,विजय लोखंडे,अभिजीत देशपांडे,निलीमा बिपीन क्षीरसागर यांचा भय्याजींच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. मा.मां.चे सुपुत्र बिपीन क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच याप्रसंगी ध्वनीफितीद्वारे मा.मा.क्षीरसागर यांचे मौलिक विचार उपस्थितांना ऐकविण्यात आले.
या प्रसंगी बोलताना पद्मभुषण डॉ.अ.ल. कुकडे यांनी मा.मा. आणि आपला स्नेहबंध हा गेली 50 वर्षांचा असल्याचे सांगुन त्यांनी मामांच्या अनेक आठवणी जागवल्या.भा.शि.प्र संस्थेच्या उभारणीत मा.मां.चे असलेले योगदान या विषयीची माहिती देवून मा.मा.हे संस्थेसाठी मित्र,विचारवंत व मार्गदर्शक होते तेंव्हा नव्या पिढीने माणिक मोती ध्येयवाद तेवत ठेवून दिशा भक्कम व प्रखर करायची असेल तर या ग्रंथाचे वाचन झालेच पाहिजे असे आवाहन केले.मा.मा.हे व्यक्ती नसुन तो ध्येयवाद होता.भा.शि.प्र संस्था ही राष्ट्रीय पुनःरूत्थानाचा अंश असल्याचे पद्मभुषण डॉ.कुकडे काका यांनी सांगितले.यावेळी सविताताई यांनी वैयक्तिक पद्य सादर केले.शांतीमंत्र पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता अंबेकर व दिवाकर कुलकर्णी यांनी करून उपस्थितांचे आभार नितीन क्षीरसागर यांनी मानले.या कार्यक्रमास भा.शि.प्र संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक रामानंद काळे,प्रांत सहप्रचारक पराग कंगळे,विभाग प्रचारक श्रीराम पांडे, प्रांत कुटुंबप्रमुख विवेकराव आयाचीत,अॅड.किशोर गिरवलकर,राम कुलकर्णी,प्रा.रंगनाथ तिवारी,दीनदयाळ बँकेच्या अध्यक्षा, सौ.शरयुताई हेबाळकर,उत्तमराव कांदे यांच्यासहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व अधिकारी, स्वयंसेवक अंबाजोगाई शहरातील शिक्षण, साहित्य ,कला,सामाजिक, राजकीय, वैद्यकिय,विधी,सहकार क्षेत्रातील मान्यवर, पञकार,भा.शि.प्र संस्थेचे पदाधिकारी, सदस्य,प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारीवृंद यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.