अखेर ‘नगर’ चा प्रश्न सुटला ; लोकसभेसाठी संग्राम जगताप विरुद्ध डॉ सुजय विखे पाटील लढत रंगणार

मुंबई (वृत्तसंस्था) : दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खूप प्रतीक्षेनंतर अखेर अरुण जगताप यांचे चिरंजीव संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाकडून डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने नगरमध्ये आता सुजय विरुद्ध संग्राम अशा दोन युवा नेत्यांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

अहमदनगरच्या उमेदवारीवरूनचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस (आय) आघाडीचा वाद दीर्घकाळ रंगला. या जागेवर विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे इच्छूक होते. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा काँग्रेस(आय)ला सोडण्याची मागणी होत होती. मात्र, राष्ट्रवादीने अखेरपर्यंत ही जागा सोडलीच नाही. त्यामुळे डॉ.सुजय विखे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.भाजपा कडून त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी ती निश्चित मानली जात आहे.
विधान परिषदेचे सदस्य अरुण जगताप किंवा आमदार संग्राम जगताप यांच्यापैकी एकाची निवड करण्यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. युवा विरूद्ध युवा उमेदवार अशीच लढत व्हावी, असा विचार पुढे आल्याने शेवटी राष्ट्रवादीकडून संग्राम यांचे नाव फिक्स झाले.

संग्राम जगताप दोन वेळा अहमदनगरचे महापौर होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंचवीस वर्षे आमदार राहिलेले शिवसेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळच्या महापालिका निवडणुकीत महापौर निवडीच्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने जगताप अडचणीत आले होते.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.