शेकडो गरजू रूग्णांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवणारी अंजुमन हेल्थकेअर वेल्फेअर सोसायटी

शेख महेशर|आठवडा विशेष

उस्मानाबाद: कुटुंबाची हलाखीची परिस्थिती.. वीट भट्टीवर मोलमजुरी करून कशी-बशी गुजराण करणारे कुटुंब… अशा अवस्थेत जगणार्या कुटुंबाचे हाल जणू संपायचे नावच घेत नव्हते. त्यातच एकेदिवशी धुतलेले कपडे वाळत घालताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. आजी, मुलगी आणि पाच वर्षाची चिमुरडी विजेच्या धक्क्याने गंभीररीत्या जखमी झाल्या. यात मातेचा मृत्यू झाला. तर आजी-नाती सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून बचावल्या. ही कहाणी आहे भूम शहरातील शेख कुटुंबाची. या कुटुंबाच्या मदती साठी जणू देवदूत म्हणून उस्मानाबादची अंजुमन हेल्थकेअर वेल्फेअर सोसायटी धावून आली; आणि या कुटुंबाच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य फुलविण्यात सोसायटीला यश मिळाले आहे.
२५ मे २०१८ हा दिवस भूम येथील शिवशंकरनगर भागात वीटभट्टीवर काम करणार्‍या शेख कुटुंबियांसाठी घातवार ठरला. या कुटुंबातील आजी, मुलगी व नात धुतलेले कपडे तारेवर वाळू घालत असताना तारे मध्ये वीज प्रवाह असल्याने एका पाठोपाठ एक चिकटल्या गेल्या. या वेळी प्रसंगावधान राखून शेजारील व्यक्तींनी लाकडाने त्यांना तारे पासून वेगळे केले. या दुर्दैवी घटनेत विजेच्या जबर धक्का बसल्याने जहीदा कासीम शेख (वय -३६) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची आई बानू वजीर पठाण (वय -६५) आणि चिमुरडी अलिशा (वय -५) या या आजी-नात गंभीर जखमी झाल्या. जखमी बानू यांच्यावर भूम येथील रूग्णालयात उपचार करण्यात आले. तर अलिशा हिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रोजी-रोटी साठी वीटभट्टीवर मोलमजुरी करणार्‍या या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने काही जणांनी अंजुमन वेल्फेअर सोसायटीकडे मदती साठी विनंती केली. अंजुमन सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला यांनी तत्काळ अलिशा हिच्या उपचाराची सर्व जबाबदारी स्वीकारून आवश्यक तेवढी मदत देण्याची तयारी दर्शविली.

त्या साठी सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. दिग्गज दापके देशमुख यांच्याशी संपर्क साधून सदरील गरिब कुटुंबातील मुलीवर उपचार करण्याची विनंती पल्ला यांनी केली. त्या नंतर तत्काळ अलिशा हिला सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. अंजुमन सोसायटीच्या मदती मुळे अलिशा वर सह्याद्री हॉस्पीटल मध्ये उपचार होऊन ती बरी झाली. गुरूवार, ३ मे रोजी सायंकाळी तिला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी उपचार आणि औषधांच्या खर्चाच्या रकमेचा धनादेश प्रकाश जगताप यांच्या हस्ते जखमी अलिशा हिचे काका मुख्तार शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या कार्याबद्दल शेख कुटुंबियांसह जिल्हाभरातून अंजुमन सोसायटीच्या कार्याचे कौतुक होत आहे. मातेचे निधन झाले असले तरी आता या दुःखातून सावरून शेख कुटुंबिय नव्या उमेदीने जगत आहे. वास्तविक चिमुरड्या अलिशा हीस तिचे काका, काकी आणि संपूर्ण कुटुंबाने आधार दिल्यामुळे या कुटुंबाच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य उमटले आहे. एकट्या शेख कुटुंबियच नव्हे तर शेकडो कुटुंबियांच्या मदतीसाठी अंजुमन हेल्थकेअर वेल्फेअर सोसायटी देवदूत बनून पुढे येत असून आतापर्यंत अनेक गरजू कुटुंबातील व्यक्तींच्या उपचारासाठी या संस्थेने मदत केली आहे. जात-पात, धर्मभेद न बाळगता मदतीसाठी याचना करणार्या प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये ही संस्था सातत्याने पुढाकार घेऊन मदत करत आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन उस्मानाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक इक्बाल शेख यांनी सोसायटीला अत्याधुनिक शवपेटी उपलब्ध करून दिली आहे. ही शवपेटी उस्मानाबाद शहरातील गरजू व्यक्तींसाठी संस्थेमार्फत मोफत उपलब्ध करून दिली जाते.
समाजात आज अनेक संस्था, संघटना सामाजिक बांधिलकी जपून गरजू शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढे येतात. मात्र अंजुमन हेल्थकेयर सोसायटीचे कार्य त्याहूनही पुढे आहे. आजपर्यंत शेकडो गरजू आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असलेल्या रुग्णांच्या उपचार अथवा शस्त्रक्रियेसाठी नेहमीच धावून आली आहे. विशेष म्हणजे कोणतीही शासकीय अथवा पुढार्यांकडून मदत न घेता या सोसायटीचे सदस्य स्वतःकडील रक्कम तसेच सामाजिक कार्याची आवड असणार्या व्यक्तींकडून तसेच व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये दानपेट्या ठेवून त्याद्वारे जमा झालेली रक्कम गरजू रूग्णांपर्यंत पोहचवण्याचे पुण्यकर्म करत आहेत. त्यांच्या या कार्याचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.
समाजात अनेक गोरगरिब कुटुंबातील रूग्ण पैशाची कमतरता असल्यामुळे गंभीर आजारावर उपचार करून घेऊ शकत नाहीत. गंभीर आजारामुळे अनेक रूग्ण केवळ वेळेमध्ये उपचार न मिळाल्यामुळे दगावतात. त्यामुळे अशा कुटुंबाचे मोठे हाल होतात. ही परिस्थिती लहानपणापासून पाहात आल्यामुळे फेरोज पल्ला यांनी अशा गरजू कुटुंबासाठी आर्थिक मदत करण्यासाठी संस्था निर्माण करण्याचा निश्चय केला. यातूनच इतर मित्रांच्या सहकार्यातून त्यांनी अंजुमन हेल्थकेअर वेल्फेअर सोसायटीची निर्मिती केली. या संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील अनेक गरजू कुटुंबांच्या आरोग्यविषयक अडचणीत आर्थिक मदत करण्याचे काम केले जात आहे. त्याचबरोबर दर तीन महिन्याला रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन रूग्णांना मोफत औषधे व उपचार केले जात आहेत. या कामात समाजातील दानशूर व्यक्तींचेही अनेकदा सहकार्य लाभत आहे.

२२० रूग्णांना १९ लाख ८४ हजाराची मदत

उस्मानाबाद शहरातील मुस्लीम समाजातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या अंजुमन हेल्थ केअर वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून शेकडो गरजूंना मदतीचा हात देण्यात आला आहे. या सोसायटीचे सर्वच सदस्य मुस्लीम असले तरी जात-पात, धर्म, आपला-जवळचा असा भेदभाव न करता गरजूंच्या मदती साठी नेहमीच धावून जात आहेत. गरजू रुग्णाची परिस्थिती लक्षात घेऊन रूग्णालयाचा खर्च तसेच औषधांवरील होणारा खर्च देखील संस्थेच्यावतीने देण्यात येत आहे. आता पर्यंत सोसायटीच्यावतीने विविध जाती-धर्मातील २२० गरजू रूग्णांना तब्बल १९ लाख ८४ हजार रूपयांची मदत देऊन सामाजिक कार्यात आदर्शवत कामगिरी केली आहे.

गरजू रूग्णांनी मदतीसाठी संपर्क साधावा.

गोरगरिब कुटुंबातील व्यक्तींना उपचारासाठी नेहमीच आर्थिक अडचणी येतात. अनेकवेळा उपचारासाठी पैसे नसल्यामुळे रूग्णांना जीव गमवावा लागतो. कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यास कुटुंब उघड्यावर येते. अशावेळी कोणतीही जात-पात, धर्मभेद न बाळगता अंजुमन हेल्थकेअर वेल्फेअर सोसायटी मदतीसाठी नेहमीच पुढे येते. आतापर्यंत शेकडो गरजू रूग्णांसाठी संस्थेने मदत केलेली आहे. या पुढे ही संस्थेचे हे काम अविरत चालू राहणार असून गरजू रूग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी संस्थेशी संपर्क साधावा.

मदतीचे आवाहन

समाजातील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी अंजुमन हेल्थकेयर सोसायटी नेहमीच आर्थिक मदत करत आहे. सध्याच्या परिस्थितीत सोसायटीच्या वतीने करण्यात येणारी आर्थिक मदत ही केवळ सोसायटीचे पदाधिकारी आणि शहरातील काही दुकानात ठेवलेल्या दानपेट्याच्या माध्यमातून उपलब्ध करून गरजू रुग्णापर्यंत पोहचवली जाते. सोसायटीकडे मदत मागण्यासाठी येणार्‍या अशा गरजू रुग्णांची/त्यांच्या नातेवाईकांची संख्या वाढत आहे. सोसायटीच्या या रुग्णसेवेच्या कार्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉक्टरांचे नेहमी सहकार्य लाभले आहे. परंतु अशा रुग्णांची संख्या लक्षात घेतल्यास सोसायटीचा निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे समाजातील दानशूर आणि सामाजिक कार्याची आवड असणार्‍या व्यक्ती व संस्थानी सोसायटीच्या या कार्याला आर्थिक हातभार लावावा असे आवाहन अंजुमन हेल्थकेयर वेल्फेअर सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच गरजू रूग्णांच्या मदतीसाठी पुढील काळामध्ये उस्मानाबाद शहरात अंजुमन चॅरिटेबल दवाखान्याची सुरूवात करण्याचा निर्धार सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला व त्यांच्या सहकार्‍यांनी केला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.