केज तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

केज तालुक्यातील विडा गावात आजही जावयाची काढली जाते 'गाढवा'वरून मिरवणूक

निझामकाळापासून विडा ग्रामस्थांनी जपली आहे परंपरा

केज : धूलिवंदनाच्या दिवशी एका जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची निझामकालीन परंपरा केज तालुक्यातील विडा ग्रामस्थांनी यावर्षी देखील जपली. विड्यातील ग्रामस्थ सावळराम पवार यांचे शिंधी (ता. केज) येथील जावई बंडू पवार यांना यंदाच्या गदर्भ सवारीचा मान मिळाला. सुरुवातीला ना-ना करणारे बंडू पवार यांनी नंतर मेहुण्यांच्या आनंदात सहभागी होत फिल्मी गाण्यांवर ठेका धरला.

दरवर्षी होळीची चाहूल लागताच विडा गावातील व आसपासचे जावई आपला नंबर लागू नये, म्हणून पसार होतात. मात्र, गावातील तरुण नजर ठेवून एका जावयाला गळाला लावून परंपरा कायम ठेवतात. या आगळ्यावेगळ्या प्रथेमागची पार्श्वभूमी अशी सांगण्यात येते कि, निजामाच्या काळात जहागीरदार असलेले अनंतराव देशमुख यांचे जावई एकदा धूलिवंदनासाठी गावात आले. त्यांची त्या वेळी गर्दभ सवारी निघाली, तेव्हापासून गावात दरवर्षी एका जावयाचा हा मान करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.जावई मिरवणुकीवरुन आजवर एकदाही साधी कुरबुर देखील झालेली नाही. सर्वच जाती - धर्मांच्या मंडळींचा मिरवणुकीत सहभाग आणि सर्वच घटकांच्या जावयांची आतापर्यंत मिरवणुक काढून विडेकरांनी यातून सामाजिक आणि जातीय सलोखाही जपला आहे. गावातील कोणाही एकाच्या जावयाला पकडून आणून त्याला तुटक्या चपलांचा हार घातलेल्या सजविलेल्या गाढवावरुन मिरवणूक निघते. मिरवणुकीसेमोर ढोल - ताशा आणि डॉल्बीच्या संगीतावर थिरकणारे तरुण आणि घरांच्या गच्चीवरुन महिलांकडून रंगाची उधळण होत असते. गावातील प्रमुख रस्त्यांवरुन ही मिरवणुक ग्रामदैवत मारुतीच्या पारावर पोचल्यानंतर ग्रामस्थांनी जमविलेल्या लोकवर्गणीतून जावयाल मनपसंत कपड्यांचा आहे केला जातो.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    विशेष म्हणजे,यंदाच्या मिरवणुकीसाठी जावई शोधण्यासाठी तरुणांचे चार पथके बुधवारी (दि. २०) रात्रीच वाहने घेऊ विविध ठिकाणी रवाना झाले. मात्र, सासुरवाडीची परंपरा माहित असल्याने अनेक जावयांनी अगोदरच भूमिगत होण्याचा मार्ग अवलंबिला होता. तसे, मानकरी ठरलेले बंडू पवार देखील गायब होण्याच्या तयारीत असतानाच विड्याच्या तरुणांनी त्यांना घेराव घालून गाडीत बसविले. सुरुवातीला नको अशा विनवण्या कामी येत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मग होकार दिला. मेहुण्यांच्या आनंदात तेही ऐवढे समरस झाले कि मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनीही डॉल्बीच्या गाण्यांवर ठेका धरला.

    बंडू पवार यांना उपसरपंच बापूसाहेब देशमुख, भैरवनाथ काळे, शहाजी घुटे, राहूल छाजड, हरी देव यांच्या हस्ते कपड्यांचा आहेर करण्यात आला.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.