राम कुलकर्णी: देशाच्या राजकिय पटलावर लोकसभेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली असुन महाराष्ट्रातल्या ४८ खासदारांच्यासाठी एकुण चार टप्यात निवडणुक होत आहे. त्यातही बीड लोकसभा निवडणुकीची तारीख १८ एप्रिल आहे. प्रत्येक पक्षाने आपआपले उमेदवार जाहिर केले असुन भाजपाने पहिली यादी जाहिर केली आहे.उद्या कदाचित २५ तारखेला जिल्ह्याच्या विद्यमान खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे ह्या आपला उमेदवारी अर्ज भरतील. लोकसभा निवडणुक पार्श्वभुमीवर बीड लोकसभेचं राजकिय गणित लक्षात घेतलं तर वर्तमान परिस्थितीत राष्ट्रवादीकडुन जाहिर झालेले उमेदवार किंवा अन्य आघाडीचे उमेदवार याचाच अर्थ जिल्ह्यात दुरंगी-तिरंगी सामना होवु शकतो. मात्र विद्यमान खासदाराचं भविष्य सुरक्षित असुन ते नेमकं कशामुळे?हा विचार या निमित्ताने करणे क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्रातील एकुण १८ जागापैकी कदाचित कुणा एकाची खात्री आज देणं अभ्यासपुर्ण ठरत नसलं तरी जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई यांच्याबाबत मात्र संपुर्ण मतदारात असलेली अनुकुलता, ना.पंकजाताई यांचे विकासाचे राजकारण आणि विरोधकांमध्ये असलेला बेबनाव हे सर्व पाहता खासदार सुरक्षित असुन मागच्या पाच वर्षात त्यांनी सिद्ध केलेले स्वकर्तृत्व जिल्हावासियांनी पाहिलं. म्हणुनच सर्व स्तरातुन त्यांना मिळत असलेला पाठिंबा विजयी होळीकडे घेवुन जाण्यासारखाच आहे.
जगात आणि महाराष्ट्रात काय चाललंय?यापेक्षा आपल्या बीड लोकसभा मतदारसंघात काय चाललं आहे?याचा अभ्यास करून वाचकांना देणं क्रमप्राप्त ठरतं. हा मतदारसंघ तसं पाहता पुर्वांपार भाजपाचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. श्री जयसिंग गायकवाड यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या चार-पाच निवडणुकीत जागा जिंकता आली नाही. रजनीताई पाटील भाजपमधुनच खासदार झाल्या तर जयसिंग गायकवाड पण अगोदर भाजपमधुन खासदार झाले.पुन्हा आयता उमेदवार म्हणुन राष्ट्रवादीने त्यांचा स्वीकार केला. परिणामी ते निवडुन आले. कारण हा मतदारसंघ केंद्र पातळीवर राष्ट्रवादीचा विचार रूजलेलाच नाही. पुर्वी स्व.केशरकाकु काँग्रेसमधुन निवडुन यायच्या.मात्र स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा जिल्ह्याच्या राजकारणात शिरकाव झाल्यानंतर तब्बल तीस वर्षे त्यांचं नेतृत्व जिल्हावासियांनी मान्य केलं आणि मग मुंडे देतील तोच उमेदवार खासदार बनायचा. राष्ट्रीय राजकारणात २००९च्या निवडणुकीत मुंडेंनी प्रवेश केला आणि त्यावेळी लोकसभा निवडणुक घडवली. आटोकाट प्रयत्न झाले तरी १,३६,०००मतांनी मुंडे विजयी झाले. खरं तर ती परिस्थिती जिल्ह्यावर राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेलीच होती. अनुकुल नसताना मुंडेंचा विजय त्याचं कारण हा मतदारसंघ भाजपाचाच बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जातो. राष्ट्रवादी पक्षाने मुंडेंना रोखण्यासाठी अनेक प्रयोग केले.पण मोठ्या साहेबांनाही ते शक्य झालं नाही. २०१४ च्या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत मुंडेंना जिल्ह्यात रोखले पाहिजे हा हेतु मनात ठेवुन शरदचंद्र पवारांनी अनेक डावपेच खेळले. तरीही पुन्हा १,२५,००० पेक्षा अधिक मताने मुंडे विजयी झाले. या निवडणुकीत जातीपातीचे राजकारण झाले, आर्थिक भांडवलीचे राजकारण झाले तरी पण मतदारांना मुंडेंचं नेतृत्व जिल्ह्याचं वाटल्याने विजयासाठी महत्वाचं वाटलं. २०१४ च्या निवडणुकीत मुंडे विजयी झाले आणि केंद्रात नरेंद्र मोदीचं सरकार बहुमतानं आलं.मात्र दुर्दैवाने मुंडेंचा अपघाती मृत्यू तो जिल्ह्यासाठी खर्या अर्थाने विकासाच्या पार्श्वभुमीवर शापच ठरला. दरम्यानच्या काळात अचानक वडिलांच्या जागेवर डॉ.प्रितमताई यांना निवडणुक लढवावी लागली आणि मग त्या देशात नंबर एकच्या मताने निवडुन आल्या.अर्थात सर्वांनीच निवडणुकीत मनाचा मोठेपणा दाखवुन मदत केली होती. सहा महिन्यानंतर केंद्राप्रमाणे राज्यात युतीचं सरकार आलं.त्यात जिल्ह्यातुन ना.पंकजाताईच्या नेतृत्वाखाली सहापैकी पाच आमदार निवडुन आले आणि हा जिल्हा साहेबानंतरही पंकजाताईच्या नेतृत्वाखाली भाजपाचा बालेकिल्ला शाबुत राहिला.प्रितमताई खासदार अन् महाराष्ट्रात पंकजाताई मंत्री.या दोन्ही भगिनींनी मागच्या चार-पाच वर्षात जिल्ह्यात फक्त विकासाचं राजकारण केलं. सत्तर वर्षापासुनची मागणी असलेला रेल्वेचा प्रश्न अवघ्या दोन महिन्यात मार्गी लावला. थेट पंतप्रधानांनी देशात पहिला रस्ता भरीव निधी देवुन मंजुर केला.ज्यासाठी २८०० कोटी रूपये खर्च अन् बघताबघता रेल्वे बीड जिल्ह्याच्या सीमेवर येवुन धडकली.थेट परळीपर्यंत रस्ता बांधणीचे काम जोमाने सुरू आहे. राजकारणात बोलणार्याच्या जीभेला कुणी आडवु शकत नाही. विरोधक म्हणतात रेल्वे फक्त १२ किमी.च जिल्ह्यात आली. ज्या प्रश्नाला सत्तर वर्षे लागले तो प्रश्न अवघ्या चार वर्षात पुर्णत: मार्गी लागला नाही पण ऐंशी टक्के काम प्रगतीपथावर ते सामान्य जनतेला समजतं. पण विरोधक बालिशपणाचं या प्रश्नावर बोलुन जातात त्याचं हासु लोकांना वाटतं. प्रितमताईनं ज्या परिस्थितीत वडिलांची जागा खांद्यावर घेतली ती परिस्थिती एका महिलेसाठी तारेवरची कसरत होती. डोंगराएवढं दु:ख छातीत दडवुन या भगिनींनी केवळ बीड जिल्हा माझा, मी जिल्ह्याचा सारी माणसं माझी हे वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी उभारी घेतली आणि बघताबघता आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. खासदाराच्या माध्यमातुन ११ राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात आले. ज्यावर दहा हजार कोटीपेक्षा जास्त खर्च होत आहे. महा आरोग्य सारखे शिबीरं घेवुन आरोग्याचा ज्ञान यज्ञ या भगिनींनी जनतेसाठी उभा केला. पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली अठरापगड जातीधर्माच्या सर्व स्तरातील लोकांना केंद्रबिंदु मानुन भगिनींनी सेवा करण्याचा विडा उचलला. प्रितमताईंनी आपलं कर्तृत्व कामातुन सिद्ध केलं. देशाच्या संसदेत दुष्काळ, ऊसतोड कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर अनेकदा आवाज उठवलेला लोकांनी पाहिला. आपल्या विकासनिधीचा उपयोग पुरेपुर जनकल्याणासाठी होतो का नाही?यावरही विशेष भर दिला. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा सुधारण्यासाठी खासदारांनी घेतलेला पुढाकार एक सामाजिक दायित्वाचं काम होय. एक सुशिक्षित, उच्च विद्याभुषित आणि डॉक्टर असलेला खासदार जिल्ह्यातील जनता पहात आहे. त्यांच्या माध्यमातुन होत असलेली प्रगती ही डोळ्यांना दिसत आहे. म्हणुनच पुन्हा निवडणुकीसाठी खासदारांच्या बाबतीत जिल्ह्यात जे पक्क फाऊंडेशन तयार झालं त्या ठिकाणी खरे विरोधक हादरले. त्यांच्या विरोधात उमेदवार न मिळणं यातच खरं विजयाचं रहस्य आहे. निवडणुकीची औपचारिकता आणि सोपस्कार पार पाडताना राष्ट्रवादी पक्षाने ऐनवेळेस उमेदवार का बदलला?आणि अगोदर उमेदवार कोण होतं?या सार्या घोळात पालकमंत्र्यांची जादुची कांडी चालली का?असे अनेक प्रश्न पुढे येत असले तरी आज कर्तृत्व सिद्ध झाल्यानंतर प्रितमताईच्या पाठीमागे जिल्ह्यातील संपुर्ण जनता खंबीरपणे उभा आहे. म्हणुन राष्ट्रवादीचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार ह्या दोघांत नेतृत्वाची क्षमता पाहिल्यानंतर तुलनाच होवु शकत नाही अशी भावना सर्वसामान्य मतदारांच्या मनात आहे. आता कुठं बीड जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे येत असताना मतदार पुन्हा वेगळी चुक करण्याच्या भानगडीतच पडणार नाही हे मात्र नक्की. शेवटी राजकारण ते राजकारण असतं.मात्र जो नेता आपले प्रश्न सोडवतो, आपल्या सुखदु:खात धावुन येतो त्याच्याच मागे जनता जाते. जिल्ह्यात ऐनवेळी गारपीट झाली तर अवघ्या काही क्षणात या दोन्हीही बहिणींचा पाय शेतकर्यांच्या बांधावर पडला. हे लोकांनी याचि देहि याचि डोळा पाहिलेला आहे. म्हणुन येणार्या लोकसभा निवडणुकीत काय होणार?याचं गणित सर्वांना माहित आहे आणि असं असलं तरी स्वत: पंकजाताई मुंडेंनी ही निवडणुक गांभीर्याने घेतली असुन जिल्ह्यातील सर्व आमदारांना कामाला लावले आहे.भाजपाचे कार्यकर्ते जोमाने प्रचारात फिरताना दिसत आहेत. दुसरीकडे शिवसेनेसोबत अखेर युती झाली असुन ती ताकदही आता ही निवडणुक जिंकण्यासाठी कामाला येणार आहे. एकुणच पार्श्वभुमीवर ही निवडणुक विरोधक रंग भरतील.मात्र राष्ट्रवादीत अंतर्गत कलहाचा शिमगा संपता संपणार नाही आणि त्याचीही पुर्वांपार चालत आलेली संस्कृती आहे.त्यामुळे रूसलेल्या गटातटाचा फायदा कदाचित प्रितमताईलाही झाला तर नवल वाटणार नाही. एक मात्र खरं आहे की बीड जिल्ह्यातील लोकांनी भर निवडणुकीत गोपीनाथराव मुंडेंच्या जादुच्या कांडीचा चमत्कार पाहिलेला आहे आणि आता हीच जादुची कांडी मुंडे जणुकाही आपल्या लेकीच्या हातात देवुन गेले असाच काही चमत्कार निवडणुक पार्श्वभुमीवर पहायला मिळत आहे.म्हणुन लोकसभेचा सामना कसाही झाला तरीही विद्यमान खासदार सुरक्षित आहेत हे मात्र नक्की.