शासनाच्या मागील ५ वर्षात केलेली विकास कामे व योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी संवेदनशिलपणे काम करावे ―नामदार बबनराव लोणीकर

नांदेड (प्रतिनिधी):येत्या लोकसभा निवडणूकीत भाजप युतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. निवडणूक जिकंण्यासाठी भाजपा सर्व कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.जे काही करायचे ते सर्व काही करा पण भाजप युतीचा उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी व्हायलाच पाहिजे.यासाठी ताकदीनिशी कामाला लागल्याचे आदेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. नामदार लोणीकरवर नांदेड लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. नांदेडमधून भाजप युतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन आपल्या भाषणातून नामदार लोणीकरांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी भाजप युतीच्या उमेदवाराची जबाबदारी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार बबनराव लोणीकारांवर देण्यात आली असून नामदार लोणीकरांनी आगामी निवडणुकीत भाजप उमेदवाराला विजयी करण्याची रणनीती ठरविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेण्याचा धडाका सुरु केला आहे. गेल्या आठ दिवसातील लोणीकारांचा हा दुसरा नांदेड दौरा असून आज मुखेड, नायगाव व नांदेड येथे बैठक घेऊन आढावा घेतला यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, श्रीकांत देशपांडे, संतुकाराव हंबर्डे, डॉ माधव किन्हाळकर, राम चौधरी, संजय कोडगे, प्रवीण गायकवाड, गणपतराव पित्तेवाड, शंकर मुटकुळवाड, सुधाकर कदम, नागनाथ भिसेवाड, सर्व विस्तारक, बुथप्रमुख, पेजप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, भाजपा मुख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

केंद्रात व राज्यात भाजप युतीची सत्ता आहे. केंद्रात मा. मोदीजी व राज्यात मा. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील विकासाभिमुख व पारदर्शी कारभाराचा अजेंडा घेऊन आपण या निवडणुकीत उतरणार असल्याने आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. मागच्या वेळी जनतेने अनेक वषार्र्ची कॉंग्रेसची भ्रष्ट राजवट उखडून फेकत भाजपाला स्पष्ट बहूमत देऊन निवडुन दिले होते त्याला अपवाद नांदेड मतदारसंघाचा होता परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. नांदेड मधील मतदार सुज्ञ आहे. त्यांना विकास कोण करू शकतो हे चांगले ठाऊक आहे. त्यामुळे यावेळेस येथील मतदारांना बदल हवा आहे. केंद्रात व राज्यात भाजप युतीची सत्ता आहे. यापुढेही ती आबाधित राहणार आहे. त्यामुळे नांदेड मतदारसंघाचा विकास भाजप युतीचाच उमेदवार निवडून आला तरच होऊ शकतो हे येथील मतदार ओळखून आहे.

माणसाच्या जीवनावश्यक गरजा व मूलभूत पायाभूत सुविधा या गुणवत्तापूर्ण पध्दतीने पूर्ण करून रस्ते, वीज, पाणी बाबत महाराष्ट स्वयंपूर्ण करण्यासठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे,महाराष्ट्रात रस्ते, वीज, घरे, पाणी योजना, आरोग्य सुविधा आदि कामांमधील अनुशेष पूर्ण करून सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुखी, समाधानी आणि सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून अनेक योजना, अनेक उपक्रम कार्यान्वीत केले आहेत. गेल्या चार वर्षामध्ये राज्याचे रस्ते विकासावरील 1700 कोटींवरील असणारा निधी वाढवून तो 6 हजार कोटी करण्यात आला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या 1 लाख 6 हजार कोटी निधीतून राज्यात 22 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गांचे दर्जेदार काम करण्यात येत आहे.तर महाराष्ट्र शासन हायब्रीड अन्युएटीच्या माध्यमातून 10 हजार किलोमीटरचे रस्ते करत आहे. राज्यात येत्या वर्ष – दीड वर्षात 30 ते 32 हजार किलोमीटरचे गुणवत्तापूर्ण रस्ते होतील. त्यातून शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेपर्यंत जलद गतीने पोहचवून शेतीमालाला चांगला दर मिळण्यास मदत होईल. ग्रामीण विकास गतीमान होईल.

राज्यात गेल्या चार वर्षात वीज निर्मितीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला असून विजेच्या बाबतीतही राज्य स्वयंपूर्ण करण्यात येत असल्याचे सांगून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने शेतमालाला हमीभाव दिला आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 16 हजार गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. यातून निर्माण झालेल्या जलसाठ्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन 40 हजार कोटी रूपयांनी वाढले आहे. टँकरने पाणी पुरवठ्याचे प्रमाणही लक्षणीयरित्या कमी झाले आहे.रस्ते झाल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही म्हणून रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातील अपुऱ्या धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने 24 हजार कोटी रूपये दिले असून यातून रखडलेले पाणी प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होईल. कृषि पंपांच्या वीज जोडण्याबाबतचा प्रश्नही मार्गी लावण्यात येत आहे. 2022 पर्यंत देशाच्या सर्वांगीण व संपूर्ण विकासाचे शासनाचे ध्येय आहे.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा १२ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केले असून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना, वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी वयक्तिक मदत अनुदान (जसे दुष्काळ, गारपीठ, पीकविमा, बॉन्डअळी अनुदान, ) व पीककर्ज वाटप माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य, मजूर, शेतकरी, कष्टकरी, सरकारच्या पाठीशी आहे. नांदेड जिल्ह्यातही मागील ५ वर्षात मोठा निधी देण्यात आला असून विकासकामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्यावेळेस नांदेड लोकसभा मतदार संघात आपला विजय निश्चित असून शासनाच्या मागील ५ वर्षात केलेली विकास कामे व योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी संवेदनशिलपणे काम करावे व विकासाच्या मुद्द्यावर मत मागवावी असे आवाहन लोणीकरांनी उपस्थित पक्ष कार्यकर्त्यांना केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.