जादूच्या कांडीने दिला आ.विनायक मेटे यांना जबर धक्का ; शिवसंग्रामचे जि.प. गटनेते अशोक लोढा, विजयकांत मुंडे भाजपात

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये केला प्रवेश

बीड दि. २३: लोकसभा निवडणुकीत जिल्हयात भाजपच्या विरोधात उघड भूमिका घेणा-या आ. विनायक मेटे यांना जबर धक्का बसला. मेटे यांचे कट्टर समर्थक असलेले शिवसंग्रामचे जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा व जि. प. सदस्य विजयकांत मुंडे यांनी आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करून एकच खळबळ उडवून दिली.

राज्यात भाजपा सोबत पण जिल्हयात मात्र पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची उघड भूमिका आ. विनायक मेटे यांनी नुकतीच घेतली होती. त्यांच्या या दुटप्पी भूमिकेवर त्यांचे समर्थकच नाराज झाले होते. अनेकांना ही भूमिका रूचली नाही, पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांना विनाकारण टोकाचा विरोध करण्याच्या त्यांच्या हट्टामुळे शिवसंग्रामच्या अनेकांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला, त्याचाच परिणाम म्हणून आज दोन्ही जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी भाजपात प्रवेश केला.

बीडमध्ये येताच ना. पंकजाताईंनी दिला हादरा

भाजपा महायुतीच्या उमेदवार खा. डाॅ प्रितमताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज येत्या सोमवारी भरण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांचे आज संध्याकाळी बीडमध्ये आगमन झाले. शहरात येताच विनायक मेटे यांना त्यांनी जबरदस्त धक्का दिला. मेटेंच्या कार्यपध्दतीवर नाराज असलेले राजेंद्र मस्के यापूर्वीच भाजपात आले होते आता जि. प. गटनेते अशोक लोढा व जि प सदस्य विजयकांत मुंडे यांनीही भाजपात प्रवेश केला. जिल्हा परिषदेत शिवसंग्रामच्या चार सदस्यांपैकी तीन सदस्य आता भाजपात आल्याने मेंटेंच्या विरोधाचा दांडा मोडून गेला आहे. लोढा व मुंडे यांच्या प्रवेशाचे ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, विजय गोल्हार, राजाभाऊ मुंडे, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, सर्जेराव तांदळे, स्वप्नील गलधर, मुन्ना फड, आदी उपस्थित होते. दरम्यान, शिवसंग्रामच्या या दोन दिग्गज कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाने मेटे पुरते हादरल्याचे समजते.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.