सोलापूर दि.२५(प्रतिनिधी): सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाले आहेत.
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतल्या नंतर चार हुतात्मा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मिरवणूक प्रारंभ करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते याचबरोबर शिंदे समर्थक तसेच काँग्रेसचे सर्व विभागांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे विविध तालुक्यातील आजी माजी आमदार, नगरसेवक, विविध पदाधिकारी आपल्या समर्थकांसह सहभागी झाले आहेत. या मिरवणुकीत सुरुवातीच्या या पट्ट्यात शहरापेक्षा ग्रामीण भागातील आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तसेच इंदिरा कॉंग्रेसच्या महिला सदस्यांची संख्या ही लक्षणीय होती. आमदार प्रणिती शिंदे आणि त्यांच्या भगिनी तसेच शिंदे कुटुंबीय या मिरवणुकीच्या अग्रभागी आहेत. याआधी सुशीलकुमार शिंदे यांनी आज सकाळी शहरातील बहुतेक सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातील काही प्रमुख व्यक्तींच्या भेटी घेऊन सदिच्छा स्वीकारल्या. मिरवणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या विजयाचा जय घोष करणाऱ्या घोषणा देत देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी फटाक्यांची अतिषबाजी करून तसेच फुलं उधळूनही कार्यकर्त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचं स्वागत केलं.
सुशीलकुमार शिंदे यांच्या स्वागतासाठी आणि निवडणुकीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी शिस्तीचे पालन केलं नाही. प्रचंड गर्दी आणि रेटारेटी याचा त्रास खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनाही झाला. चार हुतात्मा पुतळा जवळ ढकलाढकलीमध्ये सुशोभीकरणासाठी लावलेला विद्युत पोल कोसळला सुदैवानं कोणालाही इजा झाली नाही.