वरुणराजानेही केले रॅलीचे उत्साहात स्वागत !
बीड दि. २५ : कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह, नागरिकांनी केलेली फुलांची उधळण, विजयाचा जयघोष अशा जोशपुर्ण वातावरणात भाजप – शिवसेना- रिपाइं – रासप – रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार खा. डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या अभूतपूर्व प्रचार रॅलीला आज बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्यासह महायुतीचे नेते रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान, रॅली सुरू होण्यापूर्वी वरुणराजाने हजेरी लावून सर्वांनाच उल्हसित केले.
खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी आज दुपारी २ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, अमित पालवे, गौरव खाडे, यशःश्री मुंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. संगीता ठोंबरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, कल्याण आखाडे आदी उपस्थित होते.
अभूतपूर्व प्रचार रॅली
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी ४ वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचार रॅलीला वाजत गाजत सुरवात झाली. भाजपा, शिवसेना, रिपाइं, रासप महायुतीचे डौलाने फडकत असलेले ध्वज, जागोजागी नागरिकांकडून रॅलीवर पुष्पवृष्टी होत होती. पंकजाताई, प्रितमताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, मुंडे साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा, अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. माळीवेस भागात एका उत्साही कार्यकर्त्यांने तर क्रेनद्वारे आणलेला भला मोठा पुष्पहार घालून मुंडे भगिनींचे भव्य स्वागत केले. रॅली शिवाजी चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ना. पंकजाताई मुंडे व महायुतीच्या नेत्यांनी अभिवादन केले. या रॅलीत प्रदेशाध्यक्ष दानवे, डाॅ. भागवत कराड, आ. आर. अमित पालवे, गौरव खाडे, यशःश्री मुंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, आ.लक्ष्मण पवार, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, केशवराव आंधळे, बदामराव पंडित, रमेश आडसकर, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, युध्दजित पंडित, चंद्रकांत नवले आदी उपस्थित होते.
वरुणराजानेही केले लेकीचे स्वागत
रॅलीला सुरवात होण्यापूर्वी शहरात वरूणराजाचे आगमन झाले. त्याने देखील हजेरी लावून लाडक्या लेकींचे उत्साहात स्वागत केले. रॅलीत महायुतीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा भरातून हजारोंच्या संख्येने आलेले कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.