कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यशेतीविषयक

ऊसतोड कामगारांना त्यांच्या स्वगृही आणण्याचा निर्णय तातडीने घ्यावा – धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

परळी (दि.१३):आठवडा विशेष टीम― राज्यातील साखर कारखाने, विविध जिल्ह्यातील निवारागृहे यांसह ठिकठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांना त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या पशुधनासहित कोरोना संक्रमण रोखण्याबाबतची खबरदारी घेऊन आपल्या मूळ गावी स्वगृही परतण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

राज्यात सुरू असलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे बीड, अहमदनगर सह इतर जिल्ह्यातील दीड लाखांहून अधिक ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भाग व अन्य ठिकाणी अडकून पडलेले आहेत. काही साखर कारखान्यांनी राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांची तात्पुरती निवास, भोजन आदी व्यवस्था केली आहे. तर काही कारखाने बंद झाल्यामुळे गावी परत निघालेले ऊसतोड मजूर विविध जिल्ह्यांमध्ये अडकून पडले असून स्थानिक प्रशासन त्यांना मदत पोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात येत आहे, अशा परिस्थितीत विविध ठिकाणी विखुरलेल्या व संख्येने लाखात असलेल्या मजुरांची प्रचंड अडचण वाढणार आहे. ऊसतोड मजुरांच्या उपजीविकेच्या प्रश्नासह त्यांच्या पशुधनाचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. तसेच ऊसतोड कामगार त्यांच्या गावी असलेले त्यांच्या कुटुंबातील वृद्ध व लहान मुले हे हायरिस्क ग्रुप मध्ये आहेत. ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटुंबियांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे या सर्व ऊसतोड मजुरांना त्यांच्या पशुधनासहित आपापल्या मूळ गावी आणणे आता अनिवार्य बनले आहे. अडकलेल्या मजुरांची संपूर्ण माहिती त्या त्या जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यामुळे संक्रमणाच्या धोक्याला टाळत मानवी दृष्टिकोनातून या मजुरांना स्वगृही आणण्यात यावे अशी विनंती धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

तसेच या सर्व मजुरांना स्वगृही आणताना कोरोना संक्रमण रोखण्याच्या हेतूने आवश्यक सर्व नियमाचे पालन केले जावे, त्यांची व कुटुंबियांची आरोग्य तपासणी करावी तसेच त्या – त्या गावातील इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी स्थानिक प्रशासनाने घ्यावी; या सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करत ऊसतोड मजुरांना त्यांच्या स्वगृही आणण्याबाबत तातडीने निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी अशी विनंती ना. मुंडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आठ दिवसापासून पाठपुरावा

ऊसतोड मजुरांना त्यांच्या घरी परत आणण्याबाबत धनंजय मुंडे हे शासनाकडे आठ दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यांनी याविषयी आग्रही मागणी केली होती.

लॉक डाऊन सुरू झाल्यापासून ते सतत या ऊसतोड मजुरांच्या सातत्याने संपर्कात असून कारखाना, स्थानिक प्रशासन, स्थानिक कार्यकर्ते, स्वतःचे नाथ प्रतिष्ठान यासह विविध माध्यमातून या मजूरांना सर्वतोपरी निवारा, भोजन व आरोग्यविषयक सुविधा मिळतील यासाठी तसेच त्यांना मानसिक आधार देण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.

सरकार सकारात्मक – धनंजय मुंडे आशावादी

दरम्यान ऊसतोड कामगारांना त्यांच्या स्वगृही आणण्याबाबत आपण मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली असून सरकार याबाबत सकारात्मक आहे. याबाबत नक्कीच लवकरच तोडगा निघेल असा आशावाद धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button