पणजी (गोवा) : दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या गोव्यातील पणजी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक कोण लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी गोव्याचे माजीमुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल याचे नाव चर्चेत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षानी मनोहर पर्रिकर यांच्या दोन्ही मुलांना पर्रिकरांचा राजकीय वारसा चालवण्याची विनंती केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली आहे. त्यामुळे पणजी विधानसभाच्या उमेदवारीसाठी उत्पलच्या नावाचा विचार होण्याची जोरदार शक्यता आहे. तसेच माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर पर्रीकर यांच्या दोन्ही मुलांनी भारतीय जनता पार्टीचे काम करावे, अशी विनंती भाजपाने केली असल्याची माहिती मिळत आहे.
उत्पल व अभिजात हे स्व.मनोहर पर्रीकर यांचे दोन विवाहित मुले आहेत. पर्रीकर यांच्या निधनानंतर झालेल्या भेटीत राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना यांनी तुम्ही भाजपाचे काम करावे,अशी विनंती दोनही मुलांना केली होती. याबद्दलची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषद मध्ये दिलेली आहे.
पर्रीकर यांचा मुलगा पणजी मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढविणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच, तेंडुलकरांनी तसा कोणताच विषय अद्यापतरी झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर फक्त पार्टीचे काम करावे एवढीच विनंती खन्ना यांनी केली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना यांनी केलेली विनंती मान्य करावी की फेटाळावी हे ठरवण्यासारखी स्थिती त्यावेळी नव्हती. कारण दोन्ही मुलांना वडील मनोहर पर्रीकरांच्या निधनाचे दु:ख होते व त्यामुळे जास्त चर्चा झाली नसल्याचे तेंडुलकर यांनी स्पष्ट केल्यामुळे पुन्हा एकदा उत्पलचे नाव विधानसभेसाठी समोर आले आहे.