अहमदनगर : लोकसभा २०१९ च्या निवडणूकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघ मधून राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप व भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम जगताप हे भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे जावई आहेत.’कोणत्याही परिस्थितीत मी सुजय विखेंच्याच मागे राहणार’ असल्याचे स्पष्टीकरण शिवाजीराव कर्डिलेंनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना दिले आहे.
एनसिपीने माझी राजकीय कारकीर्द संपवली होती. पण लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मला राहुरीतून विधानसभेसाठी तिकीट दिले आणि पुन्हा माझे राजकीय पुनर्वसन केले. त्यामुळे संकटाच्या काळात मागे उभा राहिलेल्या भाजपशी दगाफटका करणार नाही, असे शिवाजीराव कर्डिलेंनी स्पष्ट केले आहे.
भाजपने डॉ सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत ‘सुजय’चाच ‘विजय’ होईल. परमेश्वराने नातं लावलेले आहे. त्यामुळे राजकारण आणि नाते हे दोन वेगवेगळे भाग आहे. ज्यावेळी राहुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि निवडणुकीत जो शब्द सुजय विखे आणि सर्व संचालकाना दिला, तो आजपर्यंत पाळण्याचे काम केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आहे आणि मला विश्वासात घेऊन ही उमेदवारी दिली. वेगळे काहीही घडणार नाही, एकच घडेल की सुजय विखेंचा विक्रमी मतांनी विजय होईल,असे कर्डिले म्हणाले.