ना.पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना यश !
अंबाजोगाई दि.२२:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाढीव ५० जागांना मान्यता मिळाली असून एमबीबीएसची प्रवेशक्षमता १०० वरून १५० इतकी झाली आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभुत सुविधा व रुग्णसेवेच्या दर्जामध्ये वाढ होण्याकरीता शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या पन्नास जागांना मान्यता दिली असल्याने महाविद्यालयाची प्रथमवर्ष प्रवेश क्षमता आता १५० झाली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश क्षमता यापूर्वी शंभर एवढी होती. स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या लाखो रुग्णांची संख्या लक्षात घेत जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी रुग्णालयातील सुविधांचा विकास करण्याकडे विशेष लक्ष देत सुमारे ७० कोटी रुपयांचा निधी नवीन इमारती, अद्ययावत यंत्रसामुग्री करीता मिळवला. तसेच रेडीआॅलाॅजी व अस्थिरोग विभागांत नव्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील सुरु करुन बंद पडलेले हे विभाग सक्षम केले.
यापुर्वी २०१३ साली वाढवण्यात आलेल्या ५० जागा वाचवण्यात बाजूच्याच लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची दमछाक होत असताना अंबाजोगाई च्या मेडीकल काॅलेजने ५० वरुन १५० जागांवर मारलेली उडी येथील अधिष्ठाता डाॅ.सुधिर देशमुख यांना पालकमंत्री पंकजाताई मुंडेंनी दिलेले पुर्ण स्वातंत्र्य आणि त्याचसोबत वेळोवेळी शासन स्तरावरुन रुग्णालयाच्या श्रेणी वर्धनाकडे डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी दिलेले लक्ष याचा हा परिपाक आहे.
या शैक्षणिक वर्षापासून आर्थिक मागासांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला समर्थन म्हणुन राज्यातील शासकीय व महानगरपालिका संचलित वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमता वाढवण्याच्या केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने पाहणी सुरु झाल्यानंतर स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे या महाविद्यालयास नव्याने ५० जागा वाढवण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. स्वा रा ति च्या एकुण पायाभुत सुविधा, नविन यंत्रसामुग्री तसेच डाॅक्टरांची भरलेली पदे याचा आढावा घेत या वाढीव जागा मिळाल्या आहेत.
राज्यातील एकूण २० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९७० जागा वाढतांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने या वैद्यकीय महाविद्यालयातील सोयी सुविधांचा परामर्श घेऊन श्रेणीवर्धन केले आहे.या वाढीव जागांमुळे मराठवाडा विकास आंदोलनातील लोकसंख्येच्या प्रमाणात एमबीबीएस च्या जागांच्या अनेक दशकांची मागणी अंशत: पुर्ण होत आहे.
खा.डाॅ.प्रितमताई ठरल्या विघ्नहर्ता
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाळीस वर्षांपासून पन्नास जागांचा प्रवेश मंजूर होता. रुग्णांचे आणि लोकसंख्येचे प्रमाण बघता २०१३ साली स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता पन्नास जागांनी वाढवण्यात आली.
नोव्हेंबर २०१६ मध्ये वाढीव पन्नास जागांना अंतिम मंजुरी देण्यासाठी झालेल्या एमसीआय निरीक्षणादरम्यान त्रुटींचे प्रमाण जास्त असल्याने वाढीव पन्नास जागा रद्द करण्याचा एमसीआय चा अहवाल होता.परंतु अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून स्वाराती रुग्णालयाच्या वाढीव जागांना नवसंजीवनी दिली. तसेच सोनोग्राफी मशीन, नवीन एक्स रे मशीन तात्काळ उपलब्ध करून एमसीआयचा मुख्य आक्षेप दूर केला. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करत आधुनिक यंत्रसामुग्री आणि नूतन इमारतीसाठी करोडोंचा भरीव निधी पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असल्याने खा.प्रितमताई स्वाराती रुग्णालयाच्या विघ्नहर्ता ठरल्या आहेत.