अंबाजोगाई दि.२९ (प्रतिनिधी) : कंबरेला गावठी पिस्तुल लावून बिनधास्तपणे अंबाजोगाई शहरामध्ये फिरणाऱ्या तरुणाला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई यशवंतराव चव्हाण चौकातील नगर परिषद शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर करण्यात आली.एलसीबी आणि एडीएस च्या वतीने अंबाजोगाई शहरातील फरारी आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गोविंद धर्मराज काळे हा तरुण कंबरेला गावठी कट्टा लावून यशवंतराव चव्हाण चौक परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी यशवंतराव चव्हाण चौक परिसरात सापळा लावला असता दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांना गोविंद काळे हा तरुण नगर परिषद कॉम्प्लेक्ससमोर संशयास्पद अवस्थेत उभा असलेला दिसून आला. पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले आणी त्याच्याजवळील गावठी पिस्तुल जप्त केले. गोविंदला अंबाजोगाई शहर पोलिसांच्या हवाली करून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आडके, कर्मचारी गलधर, केंद्रे, दुधाळ, शेख, हराळे यांनी पार पाडली.