सोयगाव – डांबर मिश्रित खडीचा कालवण संपल्याने रस्त्याचे काम बंद ; कालवणच्या प्रतीक्षेत मजूर उन्हात

सोयगाव दि.३०(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):बहुलखेडा ते सोयगाव रस्त्याच्या डागडुजी व दुरुस्तीच्या कामाला सार्वजनिक विभागाकडून(ता.३१)मार्चची डेडलाईन दिली असतांना शेवटच्या टप्प्यातील कंकराळा-सोयगाव रस्त्याच्या दुरुस्ती दरम्यान शनिवारी डांबर मिश्रित खडी संपल्याने दुपारपासून रस्त्याचे काम कालवण अभावी बंद झाले होते,दरम्यान अखेरीस सायंकाळी उशिरा सिल्लोडवरून पुरवठा झालेल्या डांबर मिश्रित खडीच्या ढमपर आल्याने सायंकाळी उशिरा काम वेगात सुरु करण्यात आले.त्यामुळे अवघ्या बारा तासांवर डेडलाईन येवून ठेपली असतांना चक्क माल संपल्याने नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने असा अनुभव या कामावरील मजुरांना आला होता.
फर्दापूर०- चाळीसगाव या राज्य मार्गाच्या दुरुस्ती आणि डागडुजीच्या कामांना मार्च अखेरीसची डेडलाईन असल्यामुळे शेवटच्या टप्प्यात बहुलखेडा-सोयगाव या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने हाती घेतले असतांना कंकराळा-सोयगाव या चार कि.मीच्या तुकड्याच्या दुरुस्तीसाठी मजूर रस्त्यावर आले असता कामावरील मटेरियल संपल्याने सकाळी अकरा वाजेपासून काम ठप्प झाल्याने या कामावरील मजुरांना भर उन्हात झाडाखाली बसून राहावे लागले,दरम्यान संबंधित ठेकेदाराने आधीच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उखडलेल्या रस्त्यावर केवळ डांबरचा सडा मारून या रस्त्याची थातूर-मातुर डागडुजी हाती घेवून मार्च अखेरीसची या रस्त्याची देयके काढण्याची घाई सुरु केली आहे.

दरम्यान सार्वजनिक विभागाकडून अद्यापही या डागडुजी झालेल्या रस्त्याची गुणवत्ता न तपासताच रस्त्याची देयके अदा करण्याची तयारी दर्शविली असल्याने संबंधित ठेकेदार देयके काढण्यासाठी औरंगाबादला तर इकडे रस्त्यावर कालवण संपल्याने मजूर रस्त्यावर अशी स्थिती निर्माण झाली होती.अखेरीस सायंकाळी उशिरा सिल्लोडवरून डांबर मिश्रित खडी सोयगावला पोहचविण्यात आल्याने सायंकाळी कामास प्रारंभ करण्यात आल्याने अंधारातही या रस्त्याचे काम सुरु होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.