येत्या आठवड्याभरात नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते होणार विकास कामांचे भूमिपूजन – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
सोयगाव दि.24:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव शहरातील विविध विकास कामांसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या आठवड्याभरात नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते या कामांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. कायम गैरसोयीचे समजल्या जाणाऱ्या सोयगावचा विकासाच्या माध्यमातून कायापालट होणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
सोयगाव शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेत यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. याबाबत नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली होती. त्याअनुषंगाने सोयगाव नगर पंचायत करीता नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी नगर विकास विभागाच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी 5 कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता दिली. याबाबत 3 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. या कामांच्या भूमिपूजन साठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना निमंत्रित केलेले असून येत्या आठवड्याभरात मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते या कामांचा शुभारंभ होणार आहे.
मान्यता मिळालेल्या निधींतुन सोयगाव शहरातील वॉर्ड नंबर 1 ते 17 मध्ये एल डी लाईट बसविणे, दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे, काळे नगर मध्ये विविध ठिकाणी सिमेंट काँक्रीटिकरण करणे, कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकाम व शेड करणे, बसस्टँड जवळ मुतारी व सौचालय बांधणे, भिलवाडा येथे सभामंडप बांधकाम करणे, महादेव मंदिरासमोर डोम करणे, काळे नगर येथील मंदिर समोर सभामंडप बांधणे, दत्त मंदिर ते शाम मेडीकल गटारी बांधकाम करणे, तेली समाज सामाजिक सभागृह बांधणे, कोळी समाज सामाजिक सभागृह बांधणे, बारी समाज सामाजिक सभागृह बांधणे, खंडेराव मंदिर समोर सभागृह बांधणे आदी विकास कामे करण्यात येणार असून या कामांचे भूमिपूजन मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते संपन्न होणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.