अंबाजोगाई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात अंबाजोगाई येथील चनई तांडा शिवारात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रांवर सोमवार,दि.1 एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 83 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने धाडी टाकण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथील चनई तांडा शिवारात व परिसरात हातभट्टी दारू केंद्रांवर गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली.यात दारू तयार करण्याचे प्लास्टीक टाकीत भरलेले एक 500 लिटर रसायन,200 लिटरचे 16 लोखंडी बॅरल,50 लिटरचे दोन प्लॅस्टीक कॅन यासह एकुण मिळून सुमारे 83 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच तात्काळ नष्ट करण्यात आला.या प्रकरणी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.गेल्या दोन महिन्यात निरिक्षक अनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाने ही तिसरी मोठी कारवाई केली आहे.गेल्या दोन महिन्यात अंदाजे सहा ते सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात या कार्यालयास यश मिळाले आहे.अपुरा कर्मचारी वर्ग असताना ही धाडसी कारवाईचा सपाटा राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी लावला आहे.त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.1 एप्रिल सेामवार रोजी करण्यात आलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,कॉन्स्टेबल बि.के.पाटील व वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.