औरंगाबाद, दि.०९: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत स्वायत्त प्रशिक्षण संस्थेच्या “उद्योजक निवास” येथे बांधण्यात आलेल्या विस्तारीत वस्तीगृहाचे व्हर्च्युल क्लास रुमचे उद्घाटन व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत प्रशिक्षित 100 यशस्वी उद्योजक यांच्या यशोगाथा पुस्तिकेचे विमोचन 10 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई हस्ते होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाट, तसेच विकास आयुक्त उद्योजक डॉ.हर्षदीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोहळ्यास उपस्थितांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सामाजिक अंतर व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक बा.त्रि. यशवंते यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात उद्योजकतेविषयी पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी शास्त्रशुद्धरित्या उद्योजकतेचे ज्ञान, कौशल्य आणि मानसिकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) ची स्थापना करण्यात आलेली आहे. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने आणि राज्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने 01 ऑक्टोबर 1988 ला स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय, औरंगाबाद येथे आहे. तसेच 08 विभागीय कार्यालये व सर्व जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय येथून संस्थेचे प्रकल्प अधिकारी कार्यरत आहे. संस्थेचे ध्येय जागतिक पातळीवर उद्योजकीय चैतन्य निर्मिती करणे होय. शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाद्वारे यशस्वी उद्योजक घडविणे, विविध तांत्रिक कार्यक्रमाद्वारे राज्यात उद्योजकतेला पोषक वातवरण निर्मिती आणि उद्योजकीय संस्कृती विकसीत करणे, सध्या उद्योग व्यवसायात असलेल्याचे कौशल्य वाढविणे, उद्योजकता विषयावरील माहिती संकलन, माहितीचे आदान – प्रदान आणि उद्योजकतेशी संबंधित संशोधन करणे ही संस्थेच्या स्थापने मागील प्रमुख उद्दिष्टे आहेत, असेही त्यांनी कळविले आहे.