वाघाच्या पिंजऱ्यांभोवताली पाच फूट उंच जाळी बसवण्याचा महापौरांच्या सूचना
औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―
दोन दिवसांपूर्वी सिडको परिसरात जंगलातून आलेल्या बिबट्याने शहरवासीयांना आठ तास चांगलेच दहशतीत ठेवले. त्याला जेरबंद केले नाही तोच मनपाच्या सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या बछड्याने बुधवारी (दि.४) छोट्या जाळीवरुन उडी घेत बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढे खंदक असल्यामुळे त्याला रस्त्यावर येता आले नाही. या घटनेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांसह गुरुवारी प्राणीसंग्रहालयाची पाहणी केली. यावेळी खंदकाजवळ असलेल्या अडीच फूट उंचीच्या जाळीच्या जागेवर आता पाच फुट उंच जाळी बसवण्याचा सूचना महापौर घोडेले यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात बुधवारी एका बछड्याने जाळीवर उडी मारत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पर्यटकासह कर्मचाऱ्यांची चांगलीच गाळण उडाली. सध्या प्राणिसंग्रहालयात बारा वाघ आहेत. त्यात सहा महिने वय असलेल्या चार बछड्यांचाही समावेश आहे. या बछड्यांना आईसोबत मोकळ्या जागेत सोडण्यात आले होते. नेहमीप्रमाणे पर्यटक खंदकाच्या अलीकडील रस्त्यावर वाघलिला बघत थांबले होते. तो अचानक एक पिवळा बछडा जाळीशेजारी आला, त्याने जाळीवर अलीकडे उडी मारली. तो भिंतीवर देखील चढला. परंतु, सुदैवाने पुढे खंदक असल्याने त्याला अलीकडे येता आले नाही, मात्र, यामुळे तिथे उभे असलेल्या लोकांना चांगलीच धडकी भरली. शेवटी कर्मचाऱ्यांनी या बछड्याला हुसकावून लावल्याने तो पुन्हा जाळीवरून आत पळाला. या घटनेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी प्राणीसंग्रहालयात जाऊन पाहणी केली. यावेळी प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे, उपायुक्त सुमंत मोरे, उप अभियंता एस. एल. कुलकर्णी उपस्थित होते.
स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती
केंद्रिय झू ऑथोरिटीने प्राणीसंग्रहालयात वीस दुरुस्त्या करण्याच्या सूचना पालिकेला केल्या आहेत. यामध्ये प्राण्यांच्या पिंजऱ्यांच्या दुरुस्तीसह इतर महत्वाच्या कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी आता उप अभियंता एस. एल. कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रेस्क्यू टीमसाठी यंत्रसामग्री खरेदीचा प्रस्ताव देणार – महापौर
महापालिका व वनविभाग यांच्या रॅपीड रेस्क्यू ऍक्शन टीमसाठी हायड्रॉलिक रेस्क्यू व्हॅन आणि गन, ट्रान्सपोर्ट कॅरेज इत्यादी यंत्रसामग्री खरेदीसाठी पन्नास लाखांचा प्रस्ताव डीपीसी तसेच मानव विकास मिशनकडे विभागीय आयुक्तांच्या मार्फत पाठविण्यात येणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.