पंकजाताई मुंडे यांचा बीड शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद ; प्रितमताई मुंडे यांना लोकसभेत पाठविण्याचे केले आवाहन

जिल्हयातील उद्योग व्यापार वाढीसाठी खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांना लोकसभेत पाठविण्याचे केले आवाहन

बीड दि. ०१: मागील पांच वर्षाच्या कारकिर्दीत मागासलेपणाचा कलंक पुसून जिल्हयाला विकासाच्या महामार्गावर आणण्याचे काम आम्ही केले आहे. या जिल्हयात उद्योगधंदे वाढीस लागावेत यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांना प्रचंड बहुमतांनी लोकसभेत पाठवावे असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे व्यापा-यांशी बोलतांना केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील भाजपा महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधी समवेत ना. पंकजाताई मुंडे यांनी आज संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्ह्याला मागील साडेचार-पाच वर्षात मोठ्या प्रमाणात भौगोलिक सुविधा निर्माण करता आल्या, जिल्ह्याच्या वेशीवर रेल्वेची चाचणी पूर्ण झाली, जिल्ह्यात अकरा राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून घेता आले. एक देश एक कर असा जीएसटी देशात लागू करता आला, उद्योगासाठी वीज बिलात सवलत देता आली, उद्योगासाठी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व मंजुरीच्या प्रक्रिया एका छताखाली आणल्या असे सांगून लोकनेते मुंडे साहेबांनी युती शासनाच्या काळात व्यापाऱ्यांचा जिव्हाळ्याचा जकात कर रद्द केला होता. मुंडे साहेबानी एक मोठा उद्योग केला होता त्याचे नाव माणसाला माणस जोडणे असा होता, असे त्या म्हणाल्या. देश हितासाठी भक्कम नेतृत्व असणाऱ्या नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी प्रीतमताई च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी मराठवाडा चेम्बर्स ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, हिरालाल सारडा, सुभाष सारडा, मनमोहन कलंत्री, कैलास बियाणी, संतोष सोनी, शांतीलाल पटेल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनोद पिंगळे, प्रल्हाद कराळे पाटील, भीमराव काळे, राजूसेठ मुनोत, दिनेश लोळगे, पारस लुनावत, समदरिया, वाय. जनार्धन राव, रामचंद्र मोटवाणी, प्रकाश राका, तिडके आदींसह असंख्य व्यापारी उपस्थित होते. प्रारंभी बैठकीचे आयोजक भगीरथ बियाणी, उज्ज्वल कोटेचा, महेश बुध्ददेव, उल्हास संचेती यांनी ना. पंकजाताई मुंडे यांचे स्वागत केले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.